माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

मुंबई ,२८एप्रिल /प्रतिनिधी  : माजी खासदार व राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे दु:खद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

एकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म १ जाने १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील बोरखळ येथे झाला. आमदार म्हणून ते मुंबईतील धारावी मतदारसंघातून १९८५-९०, १९९०-९५ व १९९९-२००४ असे ३ वेळा निवडून आले होते. सन १९९३-९५ या कालावधीत गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घर दुरुस्ती व पुनर्बांधणी, समाज कल्याण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. तर, १९९९-२००४ या कालावधीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कुटुंबकल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर २००९ मध्ये सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते.अभय शिक्षण केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते, रयत समता महासंघ, जनता ग्राहक सहकारी सोसायटी, राष्ट्रीय पर्णकुटी पुनर्रचना परिषद, याचे अध्यक्ष तर अखिल भारतीय अनुसूचित जाती परिषदेचे ते सरचिटणीस होते. अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेचे समिती प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. वाचन आणि समाजसेवेची त्यांना आवड होती. स्वभावाने अत्यंत विनयशील व हसतमुख असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.