वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा ; वडजी येथील महिलेची रस्त्यात प्रसूती

नातेवाईकांचा संताप ; कारवाईची मागणी

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला रविवारी पहाटे पाच वाजता प्रस्तुती कळा येत असल्याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात बारा तासानंतर नॉर्मल प्रसुती होणार नसल्याचे सांगण्यात येऊन औरंगाबादला पाठवण्यात आल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. या घटनेत बाळ-बाळंतीण सुखरुप असले तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोणी खुर्द येथील गर्भवती महिला रिजवाना पठाण यांना रविवारी (३० एप्रिल) पहाटे प्रसव वेदना सुरु झाल्याने त्यांना तातडीने लोणी खुर्द येथील आरोग्य केंद्रातुन वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दाखल केल्यानंतर सायंकाळी  सहा वाजता नॉर्मल प्रसुती होणार नसल्याचे सांगत औरंगाबादला खासगी वाहनाने पाठवण्यात आले. या रुग्णालयात १०८ च्या दोन रुग्णवाहिका आहेत. खासगी वाहनात कोणत्याही वैद्यकिय सुविधा नसल्याने शिवाय वाहनासोबत कर्मचारी अथवा परिचारिका पाठवण्यात आली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. हा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे आरोपात म्हटले आहे. गाडी निघाल्यानंतर वीस मिनिटातच गंगापुरजवळ बाळंतीणीस त्रास सुरु झाला व अखेर रस्त्यातच प्रसुती झाली.मुलीच्या नातेवाईकांनी मुलींची प्रसुती केली हे विशेष! उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे‌