वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी १८ मे रोजी मतदान

अकरा जागांसाठी होणार पोटनिवडणुक

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- ​वैजापूर तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या अकरा सदस्यांची निवड करण्यासाठी १८ मे रोजी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी २५ एप्रिल ते दोन मे या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. निवडणुक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सहा जागांसाठी वीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असुन उर्वरित पाच जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत. वैजापूर तालुक्यातील मालेगाव कन्नड या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी दोन, निमगाव- गोंदगावच्या एका जागेसाठी चार, वडजीच्या एका जागेसाठी चार, नालेगावच्या एका जागेसाठी दोन, वाघला येथील सदस्यपदाच्या एका जागेसाठी पाच व रघुनाथपुरवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी तीन असे वीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र भादली, लाखगंगा, टेंभी-कौटगाव, भालगाव व नादी या पाच ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.