वैजापूरच्या नागरिकांचा एक चांगला उपक्रम ; रस्त्याच्या कडेला दगडी मूर्ती व इतर साहित्य विकणाऱ्या पर राज्यातील कुटुंबियांना कपडे व फराळाचे वाटप

एक पणती आनंदाची,एक दिवा समाधानाचा

जफर ए.खान

वैजापूर,२२ऑक्टोबर :- दिवा अंधाराचा म्हणजेच अज्ञानाचा नाश करतो. ज्ञान, धन व आरोग्य देतो व कल्याण करतो म्हणूनच दीपावली या तेजाच्या,प्रकाशाच्या उत्सवाच्या वेळी दीपांची आवली (पणत्यांची ओळ) लावण्याची प्रथा आहे.

ही दिवाळी माझ्या, तुमच्या आणि सगळ्यांच्या घरी आनंदाची, सुखाची भरभराट घेऊन येते. हा सण आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या निमित्ताने गोडधोड खाण्याचे अनेक पदार्थ तयार होतात.घरातील लहानथोरांना नवीन कपडे, मिठाई व फटाक्यांची खरेदी केली जाते. हा सण आहेच मुळात अंधारातून नवतेजाकडे घेऊन जाणारा.

पण या आनंदाच्या क्षणांना उत्साहाने साजरे करता येईल अशी परिस्थितीअनेक कुटुंबांची नसते.जे लोक रस्त्यावर राहतात ,पालात राहतात ,फुटपाथवर राहतात त्यांनी या लखलखणाऱ्या दिव्यांची आरास ती कशी करावी?आज परिस्थितीने  आपल्याला सगळे मिळालेले आहे पण त्यातील एक दिवा जर या लोकांच्या चेहऱ्यावर तेज देणारा आसेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आपल्या परीने मदत करुन हा दिवा तेजोमय करायला हवा.या विचारांनी कोरोना काळात बंद पडलेला उपक्रम पुन्हा सुरु केला. 

लाडगाव रोड वैजापूर येते काही दगडी मुर्ती तयार करणारे परराज्यातील पाथरवट आपल्या कुटुंबासह राहतात तर काही गायरान (लोककलाकार) यांची कुटुंबे आपल्या बायका मुलांसह राहतात.या सर्व कुटुंबातील स्त्रीयांना साडी,मुलांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.

शहरातील ब्लॕक कॕट कमांडो चंद्रकांत त्रिभुवन, ॠषी अनर्थे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संजय क्षिरसागर, मो. हनिफ, अनिल संचेती, वरुण अनर्थे, राजू कोल्हे, ज्ञानेश्वर वाघ , संजय गायकवाड, बाबासाहेब कांबळे, श्रीमती मीरा टेके ,मनिषा गायकवाड यांनी या उपक्रमास सढळ हाताने मदत केली. ही सर्व माणसे हाताला हात लावून सहकार्याने समाजकार्यात सहभागी होणारी मंडळी आहेत.

तसेच या समाजहिताय उपक्रमात चव्हाण साडी सेंटर व निलेश पारख यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर अगदी घरेलू कपडे मुलांसाठी उपलब्ध करुन दिले.या उपक्रमातील साहित्याचे वाटप करण्यासाठी वैजापूरचे नगरसेवक दिनेश राजपुत हे उपस्थित होते. ओम कांबळे व डबीर शेख यांनी सहकार्य केले.