आ.बोरणारे यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ वैजापुरात निदर्शने ; प्रतिमेस जोडे मारून निषेध

वैजापूर ,२८ जून  /प्रतिनिधी :-शिंदे यांच्या गटात सामील झालेले वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना कोणत्याही निवडणुकीत उभे करणार नाही. त्यांनी उमेदवारी मिळवल्यास तालुक्यातील शिवसैनिक त्यांचे डिपॉजिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजय निकम यांनी संताप व्यक्त केला.

शिंदे गटात सामील झालेले  आमदार रमेश बोरनारे यांच्या बंडखोरीचा निषेध नोंदवण्यासाठी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वैजापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी तालुका प्रमुख संजय निकम व जेष्ठ शिवसेना नेते ॲड.आसाराम रोठे यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोमवारी (ता.27) निदर्शने करण्यात आली. यावेळी निकम बोलत होते.

ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांच्याविरोधात या तालुक्यातील जनता प्रचंड चिडलेली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुक्यात भक्कमपणे उभी राहील आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना सक्षमपणे उभी राहील व बोरनारे यांना कुठल्याही निवडणुकीत भाग घेता येणार नाही किंवा भाग घेतल्यास तालुक्यातील जनता त्यांचे डिपॉझिट घालवल्याशिवाय राहणार नाही असे निकम म्हणाले. यावेळी रमेश सावंत यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. 

बंडखोर आ. बोरणारे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध


शिवसेनेचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रतिमेस संतप्त शिवसैनिकांनी जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला.शहरातील शिवाजी पुतळ्यासमोर शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक जमा झाले.आमदार बोरनारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.तालूक्यातील जनतेने शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून एक लाखाच्या मताधिक्याने बोरणारे यांना विधानसभेत निवडून दिले होते.त्यांनी शिवसेनेचा तसेच तालुक्यातील जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा काहीही अधिकार नसल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.बाजार समितीचे माजी सभापती ॲड. आसाराम रोठे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजय निकम, जयश्रीताई बोरणारे यांची यावेळी भाषणे झाली. सुत्रसंचालन ॲड. रमेश सावंत यांनी केले. यावेळी एकनाथ शिंदे व आ.रमेश बोरणारे यांच्या प्रतिमेस  काळे फासून त्यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले.