पटोलेंच्या मोदींविरोधी वक्तव्याचा राज्यभर निषेध

भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं

मुंबई,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने राज्यभर आंदोलन पेटवले. जोरदार घोषणाबाजी करत पटोले यांचा निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांची भेट घेतली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली.

या राज्यात सरकारच्या आशिर्वादाने संविधानाचा, घटनेचा, विचारांचा गळा घोटण्याचं जे काम सुरु आहे, ते राष्ट्रपतींना कळवावं, आणि महाराष्ट्रात सुरु असलेली अराजकता थांबावावी अशी विनंतीही राज्यपालांना केल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी पटोलंवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 

Image

प्रवीण दरेकर :-देशाच्या पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे, त्यामुळे नाना पटोलेंवर तात्काळ कारवाई करण्याबाबत राज्यपालांकडे निवेदन सादर केले. तसेच राज्यात संविधानाचा, घटनेचा, विचारांचा खून करण्याचे काम सरकारच्या आशीर्वादाने सुरु असल्याचे ही राष्ट्रपतींना कळविण्याबाबत विनंती केली. उद्या बुधवारी गांधीजींच्या पुतळ्यासमोर आम्ही उपोषण करणार आहोत, युवा मोर्चाचे कार्यकर्ता सुद्धा तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतील. देशाच्या पंतप्रधानांचा झालेला अपमान भाजपा नेते सहन करणार नाही त्याकरिता सर्व स्तरावर भाजप व देशभक्तीने प्रेरित असलेली लोक आंदोलन करतील.

नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा:-भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे खुले आव्हान

‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले आहे.  

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे असे स्पष्ट करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे.

कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील श्री. भांडारी ह्यांनी केली आहे.

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना अटक करा:-प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. उपाध्ये म्हणाले की, आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा. पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या पटोलेंविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नाहीत.   

कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत देशाने उच्चांकी आघाडी घेतलेली असताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे लसीकरणाचा वेग थंडावल्याने कोरोनाचे भय कायम राहिले आहे असा थेट ठपका श्री. उपाध्ये यांनी यावेळी ठेवला. ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणावर लसीकरणापासून वंचित राहात असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच स्पष्ट होऊनदेखील पंतप्रधानांचा सल्ला झुगारून निष्काळजीपणा कायम ठेवण्याच्या ठाकरी हट्टाचे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेस भोगावे लागत आहेत. या हट्टामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रास बसला आहे, असे ते म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार जनतेस दाखवत होते. मात्र, लसीकरणाचा वेग वाढवून नागरिकांना सुरक्षित करण्याऐवजी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत ते स्वतःदेखील घरातच बसून राहिले. सर्व व्यवहार गुंडाळून व घराबाहेर जाणे टाळून ही लाट थोपविण्याचा मुख्यमंत्र्यांचा अजब ‘गनिमी कावा’ महाराष्ट्राच्या अंगलट आला असून, देश लसीकरणाचा विक्रम करत असताना महाराष्ट्रात मात्र फैलावाचा विक्रम होत आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी दाओस परिषदेहून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला होता. महाराष्ट्र लसीकरणात मागे असल्याचे त्या बैठकीतच स्पष्ट झाले होते. ग्रामीण भागात पसरविले गेलेले गैरसमज, विविध अफवांमुळे लस घेण्यातील संकोच, आणि दुर्गम भागात पोहोचण्यातील अडचणींमुळे लसीकरणाचा वेग मंदावल्याची पोरकट कारणे या बैठकीत दिली गेली होती. हे गैरसमज दूर करण्याकरिता लोकशिक्षण करावे, स्थानिक पातळीवर धर्मगुरुंची मदत घ्यावी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांचा लसीकरणातील सहभाग वाढवावा, आदी सूचना पंतप्रधानांनी त्या बैठकीत केल्या होत्या. मात्र त्यानंतरही यापैकी काहीच न करता निर्बंध लादण्याचे इशारे देत मुख्यमंत्री स्वतःदेखील घरात बसून राहिले, आणि यंत्रणा सुस्तावल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. सरकारच्या या बेफिकीरीमुळेच महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांतील लसीकरणाचे प्रमाण ६० टक्क्क्यांहूनही कमी राहिले, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान केंद्र सरकारकडून लसीच्या मात्रांचा पुरेसा साठा होत असतानाही, लसीकरणाचा वेग वाढविण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत होते. मात्र तेव्हा अपुऱ्या लसपुरवठ्याचा कांगावा करत केंद्रावर ठपका ठेवण्याचे राजकारण राज्य सरकारकडून सुरू झाले. लसमात्रांचा अतिरिक्त साठा महाराष्ट्राकडे असल्याचे स्पष्ट होऊन राज्य सरकारचा खोटेपणा समोर आला व ढिसाळपणा हेच लसीकरण मंदावल्याचे कारणही उघड झाले. आता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच कमी लसीकरणाची कबुली दिली आहे. महाराष्ट्र हे मार्गदर्शक राज्य आहे, असे आरोग्यमंत्री म्हणत असले, तरी आता अन्य राज्यांकडून मार्गदर्शन घेण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. सरकारी बेफिकीरीचा फटका जनतेस बसत असेल तर त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि, पटोले यांना तात्काळ अटक करा:-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

जालना :- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरळ ओकली  असून  पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशा स्वरूपाचे आहे त्यांना तात्काळ अटक करून महाराष्ट्र सरकारने लोकशाही जिवंत आहे असे  दाखवून द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली
सत्तेचा माज आणि मस्ती चढल्यानंतर आपण काय बोलतो याचे भान राहात नाही आणि तीच अवस्था काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली असून  पटोले यांच्या बुद्धिचा भोपळा झालेला आहे संपूर्ण राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून नाना पटोले यांना तात्काळ अटक न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे लोणीकर यावेळी म्हणाले
 मोदी यांच्यामुळे भारताची मान जगभरात उंचावली असून देशाला आर्थिक महासत्ता जागतिक महासत्ता बनवण्यासाठी मोदीची प्रयत्नशील आहेत असे असताना केवळ गांधी घराण्याला खूष करण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारंवार  पटोले यांच्या कडून मोदींच्या विरोधात गरळ ओकली जात आहेत परंतु आता त्यांच्या पापाचा घडा भरला असून यापुढे सहन केले जाणार नाही असे लोणीकर यावेळी म्हणाले
 लहान लहान वक्तव्यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अनेकांना अटक केली आहे तर मग  पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जी गरळ ओकली त्याबद्दल अटक का नाही? केवळ सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आहे काय? त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकार गुन्हा दाखल करणार का? की लोकशाहीचा गळा घोटून  पटोले यांना महाराष्ट्र सरकार अभय देणार? असा सवाल  लोणीकर यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राचे गृह खाते या प्रकरणी काय कारवाई करणार का ?

जालना :-काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी भंडारा येथे  पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांना “मी शिव्या देऊ शकतो मी त्यांना मारु शकतो” अशा प्रकारचे भावना भकडवणारे वक्तव्य करुन सर्व देशवासीयांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. भारतीय संविधानातील सर्वोच्च पदावर असणारे पंतप्रधान यांच्या बदृल असे वक्तव्य करणे व त्यांना मारण्याची धमकी देणे हा अतिश्य निंदनीय व कायदयाच्या विरोधातील प्रकार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे  यांच्या  कथीत अपशब्द प्रकरणी केस दाखल करुन अटक करण्याची तत्परता दाखविणारे महाराष्ट्राचे गृह खाते या प्रकरणी काय कारवाई करणार का ? असा सवाल भाजपचे संघटन सचिव सिध्दीविनायक मुळे यांनी उपस्थित केला .

  पटोले यांच्याविरोधात सखोल चौकशी करुन तात्काळ गुन्हा दाखल करुन योग्य ती कायदेशीर करावाई करण्यात यावी, अशी मागणी रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार यांच्या नेतृत्वाखाली संतोष पाटील दानवे जिल्हाध्यक्ष भाजपा जालना यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना तर्फे गांधी चौक जालना येथे नाना पटोले यांच्या निषेध करणारे आंदोलन करीत पोलिस उपअधीक्षक यांना निवेनाद्वारे मागणी केली व नाना पटोले यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर भांदरगे पाटील यांनी केली.यावेळी सिद्धिविनायक मुळे जिल्हा संघठन सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष सुहास मुंढे,नगरसेवक सतीश जाधव, ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, सुभाष पवार, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष बावणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनील खरे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमरदिप शिंदे, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष सोमेश काबलिये,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विकास कदम,शहर उपाध्यक्ष दुर्गेश कुरील, करण झाडीवाले, अमोल धानुरे, शहर संघठन सरचिटणीस मयूर ठाकूर,सय्यद इसाख, मनोज इंगळे, सुमित सुरडकर,सेवकराम नारियलवाले, ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्ष रोहित नलावडे,समर्पन विजयसेनानी, सुनिल पवार यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.