शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी; विविध श्रेणीत राज्याला ५ ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली,२७ जून / प्रतिनिधी :- महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये  शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी  ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून  विकसित केली असून या अंतर्गत शासनाला लागत  असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना यामाध्यमातून मोठया प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला  5  ‘क्रेता-विक्रता गौरव पुरस्कार’ प्रदान करून  गौरविण्यात आले.

विविध पाच श्रेणीत राज्याने मारली बाजी

राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून सिल्वर पुरस्काराचा मान मिळविला.  स्टार्टअप – उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा दुसरा क्रमांक आलेला असून गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून सिल्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्याने तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे  विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते  स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ या यावेळी उपस्थित होत्या.

राज्याच्या उद्योग संचालनालयाने शासकीय ई- बाजार प्रणालीला असे दिले प्रोत्साहन

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राज्याने राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी बाजारात व्यवसाय करण्यासाठी सातत्याने जेम पोर्टलवर अवलंबून राहून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे. यांतर्गत उद्योग संचालनायाच्यावतीने राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या विभागांकरिता कालबद्ध बाह्यपोच कार्यक्रम (Outreach Program) राबविला. यांतर्गत जेम पोर्टलचा वापर वाढविण्यासाठी पोर्टलचे नवनवीन फिचर्स आणि कार्यप्रणालीबाबत जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले.

खरेदी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जलद उपाय योजले. सुक्ष्म व लघु  उद्योजकांची जेम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध विभागांमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली. आतापर्यंत शासनाने पोर्टलवर 7508 खरेदीदार प्रशिक्षणार्थीसाठी  105 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 5004 पुरवठादारांसाठी 95 प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत.

राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जेम पोटर्लवर आतापर्यंत एकूण नोंदणीकृत 1073377 पुरवठादार आहेत तर एकूण नोंदणीकृत  12398 खरेदीदार झाले आहेत. यासह पोर्टलवर राज्यातील एकूण नोंदणीकृत 10,619 सुक्ष्म व लघु पुरवठादार देखील आहेत.