मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन
Image

मुंबई, दि. 11 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.

काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.