जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वैजापुरात पथनाट्यातून जनजागृती

वैजापूर ,२६ जून/ प्रतिनिधी :-जागतिक अंमली पदार्थ विरोधीदिनाचे औचित्य साधत वैजापूरात फेरी व पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. अंमली पदार्थाचे वाढते व्यसन व तरुणाई भोवती पडत असलेला व्यसनांचा विळखा पडत आहे. जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशनच्यावतीने कार्यालयापासून जन जागृती फेरी काढून व ठक्कर बाजार येथे पथनाट्य व गीताच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनाने होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व शैक्षणिक दुष्परिणाम दाखविण्यात आले. तसेच अंमली पदार्थ त्यागण्याचा संकल्प ही करण्यात आला.

उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या फेरीला ध्वज दाखवीला,. “जीवनाला हो म्हणा–अंमली पदार्थाना नाही म्हणा “निषेध करा-निषेध करा, अंमली पदार्थांचा निषेध करा” अशा घोषणा देत ही फेरी ठक्कर बाजार येथे पोहचली व पथनाट्य सादर केले. शिक्षक स.ना.शेख व शिवप्रकाश देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी वैभव पारखे, बिपीन जगताप, वैष्णवी पांडुरे, ईशा उदगीरकर, ऋषीकेश  कवडे, कृष्णा राऊत, योगीराज कुमावत, भारती अहेवाड, साक्षी हडपे व भाग्यश्री यांनी सहभाग नोंदवून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती केली‌. सुत्रसंचलन व आभार धोंडीराम ठाकूर यांनी मानले.