वैजापूर पालिका स्वछता सर्वेक्षणात राज्यस्तरावर पाचव्या क्रमांकावर ; “थ्री स्टार” मानांकन

स्वच्छ सर्वेक्षणात सलग पाचव्यांदा पालिकेला मान 

वैजापूर,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात वैजापूर नगरपालिकेने उत्तम स्वच्छता कामगिरीचे क्रमवारीत मराठवाडा विभागात प्रथम क्रंमाकाचे स्थान पटकावण्याची अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे. तसेच राज्यस्तरावर पाचवे स्थान गाठले.

स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेत सलग पाचव्यांदा वैजापूर नगरपालिका उत्कृष्ट कामकाजामुळे बक्षीसासाठी पात्र ठरल्याचा नव्या विक्रमांची नोंद नगराध्यक्ष शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक आणि प्रशासनातील प्रमुख अधिकारी व कर्मचा-यांनी निर्माण केला.

स्वच्छ भारत मिशन नागरी अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 या वर्षातील नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक मोहीमेतील कामकाजाचे अंतिम मूल्यमापन निकाल जाहीर करण्यात आला. या उपक्रमात नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांचेसह प्रशासनातील कर्मचा-यांनी लोकसहभागातून स्वच्छतेचे कामे केली होती.या सर्वांचे वैजापूर नगरपालिकेला सर्वेक्षण कामगिरीत कोणते स्थान मिळते याकडे लक्ष होते. स्वच्छ सर्वेक्षणात वैजापूर पालिकेने मराठवाडा विभागात सर्वप्रथम, पश्चिम विभागात पाचवा तसेच राज्यपातळीवर  पाचव्या क्रमांकाचे  स्थान निश्चित करुन थ्री स्टार मानांकनाचा बहुमान प्राप्त करण्याची चमकदार कामगिरी बजावली.

स्वच्छतागृह वापरात मराठवाडयात अव्वलस्थान

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरी क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक स्वच्छतागृह वापरात नगरपालिकेने मराठवाडा स्तरावर प्रथम क्रमांक स्थापित केला आहे.हगणदारीमुक्त उपक्रमात 6 हजार पैकी 5 हजार 442.02 गुण प्राप्त करुन वैजापूर नगरपालिकेने सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीची भरारी घेतली.

लोकसहभागाचे भक्कम पाठबळ – नगराध्यक्ष शिल्पा परदेशी

वैजापूर नगरपालिकेला 2018 ते 2022 असे सलग पाच वर्षात केंद्राचे स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेत नागरी भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्याचा बहुमान मिळाला. यावर नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल हा बहुमान मिळाल्याचे सांगितले. नगरसेवक आणि पालिकेचे सीईओ भागवत बिघोत यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता विभागाच्या टीमने रहिवासी नागरिकांना सुदृढ निरोगी आरोग्यासाठी प्रामाणिकपणे हाती घेतलेल्या स्वच्छता मोहीमेला अभूतपूर्व लोकसहभाग  मिळाल्यामुळे नगरपालिकेने सलग पाच वर्ष स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीपर्यत यशाचा टप्पा गाठल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी नोंदवली.