गोदावरीला महापूर ; वांजरगाव येथील शिंदे वस्तीला पाण्याचा वेढा नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या सातपैकी पाच पूल पाण्याखाली

वैजापूर,१३ जुलै /प्रतिनिधी :- नाशिक  जिल्ह्यात  झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. अंत्यत धोक्याच्या पातळीवरुन नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात होत असल्यामुळे अहमदनगरला जोडणारे सात पैकी पाच वाहतूक संपर्क पुल पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहनधारकांसाठी या मार्गावरुन वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर या मार्गावरील रहदारी पुर्ववत करण्यात येईल असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारी मध्यरात्रीपासून 72 हजार क्युसेक वेगाने सोडले होते. गोदावरी नदी पात्रात विविध धरणातील पाणी साठा निफाड येथील नांदूर मधमेश्वर वळण बंधा-यातून सोडले आहे. दुपारी चार वाजता जवळपास नदीपात्रातून  80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नदीपात्रातून पाणी प्रवाह धोक्याच्या पातळीने वाहत आहे. डोणगाव, वांजरगाव, कमलपूर यासह नगरला जोडणारे वाहतूक पुला पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. पूरप्रभावीत भागाला तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी कैलास जाधव, वीरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद रोडगे यांनी भेट दिली.

सराला बेट परिसरात गुरुवारी  गुरुपौर्णिमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भविक वर्ग उपस्थितीत राहतो. मात्र वांजरगाव येथून सराला बेटाला जोडणा-या संपर्क पुलापर्यत पुराचे पाणी येऊन ठेपल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला भाविकांना प्रवेश देऊ नका अशी विनंती केली होती.रामगिरी महाराजांनी नदी पातळी धोक्याच्या स्थितीतून वाहात असल्यामुळे त्यांनी  प्रशासनाने केलेल्या मागणीला प्रतिसाद देऊन सराला बेटावरील कार्यक्रमाला भाविकांनी येवू नये असे आवाहन त्यांनी केल्यामुळे प्रशासनाने नि:सुटकेचा श्वास घेतला. 


सराला बेटाजवळील  शिंदे वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा..अधिका-या कडून  नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…. 

सराला बेट परिसराजवळील पूरप्रभावीत भागातील शिंदे वस्तीला गोदावरी नदीच्या पाण्यामुळे वेढा पडलेला आहे. या वस्तीवर एकूण 45 कुंटुबातील 380 लहान मोठे नागरिक वास्तव्यास आहेत.तसेच या ठिकाणी 200 मोठे पाळीव तर 109 लहान जनावरे आहेत. या कुंटुबा पर्यत ट्रॅक्टरद्वारे तहसीलदार राहुल गायकवाड, बीडीओ कैलास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद रोडगे यांनी पोहचून त्यांना  सुरक्षित स्थळी रवाना होण्याची त्यांना विनंती केली. मात्र या कुंटुबांनी नदीपात्राचे पाणी या भागापर्यत  पोहचत नसल्याचे  सांगितले. समुद्र सपाटीपासून 490 मीटर उंचीवर हा भाग असल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. आणीबाणी ची परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले. 

या धरणातून सुरु आहे, जलविसर्ग… 

गोदावरी नदी पात्रात नाशिक जिल्ह्यातील दारणा  14342, कडवा  – 3517,गंगापूर धरण -10035 , होळकर पूल,   नांदूर मधमेश्वर वळण बंधा-यातून एकूण  79,848 क्युसेक वेगाने जलविसर्ग सोडण्यात आला आहे.