विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसींनीही घेतले तोंडसूख

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधक भाजपला हरवण्यासाठी काल एकत्र आले होते. या बैठकीवरुन आम आदमी पार्टीने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनी दोखिल नाराजी व्यक्त करत तोंडसूख घेतले. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या बैठकीवरुन नाराजी व्यक्त केली.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आमच्यावर विरोधकांचा विश्वास आहे की नाही माहित नाही, पण आम्हाला दुर्लक्षित केलं हे बरोबर नाही, असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मी स्वतःहून त्यांच्या बैठकीत जाणार नाही, भाजपाला हरवण्यासाठी अजेंडा गरजेचा आहे, असंही यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील विरोधकांच्या बैठकीला एमआयएमला न बोलवण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. पाटण्याच्या बैठकीत एमआयएमला बोलवलं नाही. भाजपला हरवण्यासाठी एमआयएमला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्हाला दुर्लक्षित करुन चालणार नाही, आम्हाला बोलवा आम्ही बैठकीला येऊ, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी ओवेसी म्हणाले की, आम्हालाही वाटतं भारत अमेरिकेचे संबंध चांगले व्हावेत. पण पंतप्रधान मोदींनी तिकडे परदेशात पत्रकारांशी संवाद न साधता दिल्लीत साधावा. भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाही असं त्या ठिकाणी सांगितलं पण मग मणिपूरमध्ये चर्च जाळली गेली त्याचं काय असा सवालही यावेळी ओवेसी यांनी केला.