शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयाचे वारकर्‍यांकडून जोरदार स्वागत

इतिहासात पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरु असताना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा निर्णय

कोणालाही व्हीआयपी एंट्री मिळणार नाही

पंढरपूर : राज्यभरातून लाखो वारकरी तहानभूक विसरुन विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या वारकर्‍यांना आषाढी एकादशीदिवशी होणार्‍या शासकीय पुजेमुळे मात्र बराच काळ ताटकळत थांबावे लागते. पण यंदाच्या शिंदे-फडणवीस सरकारला एवढी पायपीट करुन येणार्‍या सर्व माऊलींना बाहेर थांबवून शासकीय महापूजा आटोपण्याची गोष्ट पटली नाही आणि महापूजा सुरु असतानादेखील मुखदर्शन सुरु ठेवण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय इतिहासात पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे.

यापूर्वी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू व्हायच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. परंतु रांगेतला कालावधी चार तासांनी वाढल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळेच आषाढी एकादशी वारीतील या पर्वणीच्या दिवशी दिवसभर दर्शनाची वाट पाहणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने या वेळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन होणार आहे.

कोणालाही व्हीआयपी एंट्री मिळणार नाही

याआधी शासकीय पूजा पार पडल्यानंतरही राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करत. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना आणखी काही काळ ताटकळत राहावे लागे. याबाबतदेखील शिंदे-फडणवीस सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आहे. यानुसार आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी आजच्या घोषणेत म्हटले.

यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही. या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय सुखावला आहे.