देशात पुढची ५० वर्षे भाजपचीच सत्ता – केंद्रीय मंत्री नारायण राणे

देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारणीच्या कामाचा शुभारंभ

मालवण ,२२ मे /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे झपाट्याने वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रातही पुढील ५० वर्षे भाजपचीच सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदललेली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. ही बकरी सेना झाली आहे, अशीही कडवट टीका राणे यांनी केली.

सागरी अतिक्रमणाचा धोका वाढलेल्या देवबाग किनारपट्टीवर अत्यावश्यक ठिकाणी त्वरीत बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटींचा खासदार निधी तत्काळ उपलब्ध करून दिला. या बंधारा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी देवबाग ग्रामस्थांच्यावतीने राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबागच्या शिवसेना सरपंच यांचे पती मनोज खोबरेकर यांनीही राणे यांचे विशेष स्वागत केले.

फसवणारे लोकप्रतिनिधी नकोत…

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘१९९० साली पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा देवबाग ग्रामस्थांनी बंधाऱ्याची मागणी केली. बंधारा बांधला. रस्ता बांधला, गाव वाचवले. यापुढेही देवबागच्या पाठीशी ठाम उभे राहणार. मात्र जनतेला फसवणारे लोकप्रतिनिधी यापुढे नको असा जनतेने विचार करावा’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देशात काम करण्याची जबाबदारी मला दिली. ती मी यशस्वीपणे पार पाडत आहे.

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालय हे पहिल्या क्रमांकावर आहे. असे काम माझे मंत्रालय करत आहे. तुम्हा जनतेचा आशीर्वाद मला आहे व येथील जनतेने मला नेहमीच प्रेम दिले आहे. व मी ते विसरू शकत नाही. देशातील माझा सर्वात आवडता तालुका मालवण असल्याचे राणे म्हणाले. ‘आठ वर्षात येथील आमदाराला बंधारा प्रश्न का सोडवता आला नाही.

जनतेचा विकास करण्याची धमक कोणात आहे, हे जनतेने ओळखावे. या आमदारामध्ये धमक, हिम्मत नाही, असेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री फक्त बोलतात काम कुठे आहे. राज्य दिवाळखोरीत जात आहे. विकास ठप्प आहे’, असे ते म्हणाले.

प्रक्रिया उद्योगातून प्रत्येक घराचा विकास

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत. माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. पर्यटन, काथ्या उद्योग या माध्यमातून प्रत्येक घरात विकास झाला पाहिजे. माझे सहकार्य कायम असेल असेही राणे म्हणाले.

मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत

मुख्यमंत्री काचेच्या मातोश्रीत राहतात. बोलत नाहीत, चालत नाही. जनतेला भेटत नाही. गद्दारी करून सत्ता मिळवली. वादळ नुकसानीत सिंधुदुर्गला २५ कोटी देतो म्हणाले, कुठे आहेत? राज्यात विकासाचे एक मोठे काम केले असेल तर सांगावे. आज मराठी माणूस मुंबईत राहिलेला नाही, हेच सेनेचे काम आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.जनता अश्या सत्ताधारी मंडळींना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. आत्मनिर्भर भारत बनवणाऱ्या भाजपच्या पाठीशी जनता ठाम उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात यापुढे भाजपचेच सरकार येणार-निलेश राणे

यावेळी प्रदेश भाजप सचिव, माजी खासदार निलेश राणे म्हणाले, राणे साहेबांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकारी यांनी खासदार निधीतून होणाऱ्या बंधारा उभारणीच्या कामास एका मिनिटात मंजुरी दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी दाखवलेली तत्परता आमदार वैभव नाईक यांना आठ वर्षात दाखवता आलेली नाही. आठ वर्षात बंधारे बांधले नाहीत. मात्र राणे साहेबांनी बंधाऱ्यासाठी एक कोटी निधी देताच बंधारे मी आणले म्हणून भूमिपूजन करण्यास सुरूवात केली. राणे साहेबांनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. अशी टीका निलेश राणे यांनी केली.