औरंगाबादेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवर सोमवारी हंडामोर्चा

औरंगाबाद ,२२ मे /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा प्रश्नी येत्या २३ मे रोजी औरंगाबादेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवर हंडामोर्चा  काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. 
मनपाच्या वतीने औरंगाबाद शहराला ६ ते ८ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. उन्हाळ्यात ही परिस्थिती अजूनच भयंकर होत चालली आहे. त्यामुळे शहरवासी मेटाकुटीला आले असल्याचे चित्र सध्या औरंगाबादेत पाहायला मिळत आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच पाणीपट्टीमध्ये निम्मी कपात केल्याची घोषणा केली असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणी पुरवठा काही सुरळीत झालेला नाही. याच प्रश्नावरून आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


येत्या २३ मे रोजी शहरातील पाणीप्रश्नी भाजपच्या वतीने पैठण गेट ते मनपा कार्यालय असा हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

Image


त्याच्या वातावरण निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्वत: शनिवारी सिडको-हडको भागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. या वेळी महिलांनी त्यांना रिकामे हंडे दाखवले. त्यावेळी हीच परिस्थिती बदलण्यासाठी हा मोर्चा असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. हडको परिसरातील गजानननगर, मयूरनगर, सुदर्शननगर, सुभाषचंद्र बोसनगर, रवीनगर आदी भागांतील महिला साई मैदानात डॉ . कराडांची भेट घेऊन पाणी समस्या सांगण्यासाठी एकत्र आल्या होत्या. या वेळी भाजपचे मंडळाध्यक्ष सागर पाले, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे, महेश माळवदकर, माधुरी अदवंत, मुकेश जैन उपस्थित हेाते.