मी तुमच्या कुटुंबाबद्दल बोलू लागलो तर तुम्हाला शवासन करावे लागेल – उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये

मुंबई ,२४ जून /प्रतिनिधी :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे पाटण्याला गेले असताना फडणवीस कुटुंबाला त्यांच्यावर कुटुंबाला वाचवण्याची गेले असल्याची टीका केली. त्यावर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आणि मी तुमच्या कुटुंबाबद्दल बोलू लागलो तर तुम्हाला शवासन करावे लागेल, असा इशारा दिला. 

शनिवारी (२४ जून) मुंबईत शाखाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसैनिकांना सांगून मी शुक्रवारी (२३ जून) पाटण्याला गेलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात इतकी भीती आहे. मी पाटण्याला गेलो तर ते लगेच सांगतात की कुटुंब सोडवायला गेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये. फडणवीस यांचेही एक कुटुंब आहे. त्यांच्या कौटुंबिक व्हॉट्सअॅप चॅट्स समोर येत आहेत. आम्ही अद्याप याबद्दल बोललो नाही. फडणवीस परिवाराबाबत बोलायचे झाले तर त्यांना फक्त शवासन करावे लागेल. कोणतेही वेगळे असं करायची गरज लागणार नाही. शवासन फक्त, फक्त आडवे. योग दिवस,” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना घेरले.
‘फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबद्दल बोलू नये. मी माझ्या कुटुंबाबद्दल संवेदनशील आहे आणि हे माझे कुटुंब आहे. सुरज माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि हे सर्व शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरी कोणी घेत असेल, तर तुम्हाला माहिती आहे. मात्र, मी माझ्या कुटुंबाचे रक्षण करीन आणि ते माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.