भाजपाच्या महावितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

Displaying BJP PRESS PHOTO 05_2.jpg

मुंबई, दि. ५ :थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. देवयानी फरांदे, आ. रवींद्र चव्हाण, आ. अतुल भातखळकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी  झाले होते. सामान्य जनतेनेही या आंदोलनाला पाठिंबा देत आघाडी सरकार विरुद्धचा असंतोष व्यक्त केला.

कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे  आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. राज्य सरकारच्या या जुलमी कारभारा विरोधात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. भाजप कार्यकर्ते आंदोलन करून थांबणार नाहीत. भाजप कार्यकर्ते  वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील असे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

आ. बावनकुळे यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात गोरगरीब, श्रमिकांचे, छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले होते. असे असतांना महावितरणने अनेकांना हजारो, लाखो रुपयांची वीजबिले पाठविली. ही चुकीची बिले दुरुस्त करून देण्याऐवजी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत.

कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती  बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही.  अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही.  जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.