मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत आज ‘बीआरएस’ची जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर ,२३  एप्रिल / प्रतिनिधी :-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची २४ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगरातील जबिंदा मैदानावर सभा होणार आहे. या सभेत मराठवाड्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये अनेक विकासकामे करत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची विकासाची दुरदृष्टी बघता महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करत आहेत. शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पक्षाला महाराष्ट्रात वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेण्यात आला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रीत करत त्याअनुषंगाने २४ एप्रिलला बीड बायपास परिसरातील जबिंदा मैदान येथे ‘बीआरएस’ची सभा घेण्यात येणार आहे. या सभेत मराठवाड्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आ. जीवन रेड्डी, खासदार बी. बी. पाटील, आ. शकील अहमद, भारत राष्ट्रीय किसान समितीचे राजाध्यक्ष माणिक कदम, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, राज्याचे नेते प्रविण जेठेवाड, मौलाना अब्दूल कदीर, हर्षवर्धन जाधव, शंकर अण्णा धोंडगे, अभय पाटील चिकटगावकर, अण्णासाहेब माने पाटील, दिलीप अण्णा गोरे, शिवराज बांगर, संतोष माने पाटील, सुनिल धोंडगे, नागनाथ घिसेवाड आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

——-

माजी खासदार, आमदारांचा पक्षात प्रवेश

तेलंगणा येथील विकासाचा मॉडेल महाराष्ट्रात व्हावा, अशी येथील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जबिंदा मैदानावर आयोजित जाहीर सभेत छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील माजी खासदार, माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी नगरसेवक ‘बीआरएस’मध्ये प्रवेश घेणार आहेत.