‘अमृत धारा’ या मानवी दुग्धपेढीचे लोकार्पण

रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रांट प्रकल्पा अंतर्गत प्रकल्प 

छत्रपती संभाजीनगर,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रांट प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब औरंगाबाद पश्चिम व व रोटरी क्लब कॅल्गरी, कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत धारा’ या मानवी दुग्धपेढीचे लोकार्पण आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील नवजात शिशु अतिदक्षता विभागात करण्यात आले.

उद्घाटन आज सकाळी १० वाजुन ३० मिनिटांनी रोटरी जिल्हा ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकल (वाई) व प्रभारी अधिक्षक डॉ. प्रसाद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.वर्षाला तब्बल २१००० बालकांचा जन्म सदर रुग्णालयात होतो. अनेक बालकांना जन्मल्या जन्मल्या अतिदक्षता विभागात पाठवावे लागते. आईचे दूध हे या बालकांसाठी सर्वात उपयोगी अन्न असते. ते अनेक कारणांमुळे बालकांना मिळत नाही. गरज असलेल्या बालकांना आईचे दुध मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे व नवजात शिशू मृत्यू दर कमी व्हावा हा या उपक्रमामागचा मूळ उद्देश आहे.५८ हजार डॉलर एवढा खर्च ह्या उपक्रमासाठी आला आहे. ही रक्कम रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पश्चिम च्या सदस्यांनी उभी केली. दहा हजार डॉलर रोटरी क्लब कॅल्गरी, कॅनडा यांनी दिले, दोन हजार डॉलर रोटरी क्लब जेम्स रिव्हर रिचमंड, अमेरिका यांनी दिले.

स्थानिक उद्योजक व व्यावसायिक यांनी सुद्धा उल्लेखनीय योगदान केले.‌ पगारीया ऑटो प्रा. ली. चे संचालक श्री राहुल पगारीया, अरिहंत होंडाचे संचालक श्री. राहुल मिश्रीकोटकर, श्री. अनुप्रास बझाझ यांनी बहुमूल्य मदत केली.या सर्व प्रयासातुन ३६ हजार डॉलर एवढी रक्कम जमा झाली त्यात रोटरी फाउंडेशनने २२ हजार डॉलर एवढी रक्कम दिली.मराठवाड्यातील ८ तसेच अहमदनगर, सातारा व सोलापूर या ११ जिल्ह्यातील ही पहिलीच दुग्ध पेढी आहे.

नवजात शिशु अतिदक्षता विभागात पेढीचे उद्घाटन झाल्यानंतर ग्रंथालयात उद्घाटन समारंभ पार पडला. नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख (अमेरिका) प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. राजेंद्र खडके व रोटरी क्लब कॅल्गरी चे सदस्य मॅडलिन किंग व बॉब टेलर (स्पेन) यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले व आपल्या भावना व्यक्त केल्या‌. प्रकल्पाचे कंत्राटदार श्री. मुकुंद देशपांडे यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती सादर केली.

अध्यक्ष हबिब शेख यांनी स्वाती हेरकल व डॉ. प्रसाद देशपांडे यांचे स्वागत केले. सचिव आनंद असोलकर यांनी सह प्रांतपाल स्वाती स्मार्त यांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष डॉ. रूपाली अष्टपुत्रे व अजित वैष्णव यांनी इतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

अध्यक्ष हबिब शेख यांनी स्वागतपर भाषण केले.प्रकल्प प्रमुख हेमंत यांनी आपल्या संबोधनात प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचा नामोल्लेख केला व प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.माजी प्रांतपाल व जिल्हा रोटरी फाउंडेशन प्रमुख रो. सुहास वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभारी अधिक्षक डॉ. प्रसाद देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सह प्रांतपाल रो. स्वाती स्मार्त यांनी प्रांतपालांची ओळख करून दिली.

प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी प्रकल्प प्रमुख हेमंत लांडगे व सह प्रकल्प प्रमुख डॉ. रुपाली अष्टपुत्रे यांचा सत्कार केला. सर्व क्लब सदस्यांचे इतका लोकाभिमुख प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अभिनंदन केले. रोटरी फाउंडेशन ची आर्थिक ताकद व रोटरी सदस्यांची मेहनत सामान्य माणसांच्या आयुष्यात कशी बदल घडवून आणू शकते याची अनेक उदाहरणे दिली व प्रकल्पाला पुढील दीर्घ आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. अमोल जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.‌ राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.कार्यक्रमाला रोटरी जिल्हा ३१३२ चे २०२५-२६ साठीचे निर्वाचित प्रांतपाल सुधीर लातुरे (लातुर), माजी प्रांतपाल सुहास वैद्य, जिल्हा सचिव प्रमोद शिंदे (वाई), माजी अधिष्ठाता श्रीमती कानन येळीकर, शहरातील इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे पदाधिकारी, रोटरी क्लब औरंगाबाद पश्चिम चे पदाधिकारी व वार्ताहार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.