समाजकंटक व विघ्नसंतोषी वृत्तीला आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज – जिल्हा पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया

शांतता व सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव 

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  समाजातील समाजकंटक व विघ्नसंतोषी वृत्तीला मुळासकट उखडण्यासाठी पोलिसांच्या मदतीला नागरिकानी सहकार्य केले तर समाजातील ही वृत्ती कायमची उखडून समाजात शांतता व सुव्यवस्था नांदेल असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया यांनी बुधवारी (ता.21) वैजापूर पोलिस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. 

शहरात काल रात्री काही विघ्नसंतोषी वृत्तीने येवला रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाची तोडफोड केली त्या अनुषंगाने त्यांनी वैजापूरला भेट दिली.त्यानंतर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व प्रशासनाला नेहमीच मदत व सहकार्य करणारे तसेच विधायक दृष्टीकोण ठेवून सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्यासह  काल रात्री घडलेल्या घटनेनंतर कायदा व सुव्यस्था राखण्यात पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल हाजी शेख अकिल, युवासेनेचे अमीर अली, काझी मलिक, एमआयएमचे अकिल कुरेशी, शेख रियाज यांचाही विशेष सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलतांना कलवानिया पुढे म्हणाले की, धार्मिक स्थळांची सुरक्षितता नागरिकांनी करायला पाहिजे. शहरात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच तरुण वर्गाने मोबाईलचा गैरवापर टाळावा, पालकांनी विशेष लक्ष द्यावे असे सांगून येणारे उत्सव बकरी ईद व आषाढी एकादशी गुण्यागोविंदाने साजरी करावी व कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन केले.

सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, तहसीलदार एस.ए.सावंत, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी ही सदस्यांना येणारे उत्सव शांतता व बंधूभाव राखून साजरे करावे असे आवाहन केले. मा.नगराध्यक्ष  साबेरखान, व्यापारी संघटनेचे प्रकाश बोथरा, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, रियाज पठाण आदींनी सूचना मांडल्या. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख, नगरसेवक गणेश खैरे, सखाहरी बर्डे, काझी हाफिजोद्दीन, काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, अल्ताफ बाबा, साबेर शेख, ज्ञानेश्वर सिरसाट, पत्रकार भानुदास धामणे, युवासेनेचे  अमीर अली, सय्यद हिकमतउल्ला, निलेश पारख, शिवसेना शाखाप्रमुख आवेज खान, रियाज शेख  यांच्यासह नागरिक मोठयासंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.