पंतप्रधानांनी प्रोत्साहन पॅकेज बाबत योग्य धोरण अवलंबले, ज्यामुळे महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा जोमाने भरारी घेता आली – राजीव चंद्रशेखर

नवी दिल्ली ,१९ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- गेल्या 2 वर्षात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत लवचिकता दाखवली आहे. आपल्या  पंतप्रधानांनी प्रोत्साहन पॅकेजबाबत योग्य  धोरण अवलंबले. आपण अतिरिक्त खर्च केला नाही , तर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोत्साहन दिले. प्रोत्साहन कसे द्यायचे नाही हे आपण 2008 मधून शिकलो आहोत, असे राजीव चंद्रशेखर यांनी 4थ्या सीआयआय जागतिक  इलेक्ट्रॉनिक्स शिखर परिषदेच्या  – इंडिया गियर अप टू मॅन्युफॅक्चर फॉर द वर्ल्ड या शीर्षकाच्या समारोप  सत्राला संबोधित करताना सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदी सरकारद्वारे अर्थव्यवस्थेच्या सूक्ष्म हाताळणीचे कौतुक केले.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राबाबत सरकारच्या धोरणाविषयी बोलताना, राजीव चंद्रशेखर म्हणाले की “आपल्या  इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचा मूलभूत आराखडा  – इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेचा विस्तार आणि रुंदीकरण ” हे आहे.  त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या पुढील  1000 दिवसांच्या कृती आराखड्याचा उल्लेख केला ज्याचे उद्दिष्ट आत्मनिर्भर भारतासाठी 1 ट्रिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था साध्य करणे हे  आहे.

त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर अलीकडेच प्रकाशित केलेल्या रुपरेषेचाही  उल्लेख केला.  ज्यात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील 300 अब्ज डॉलर्स डिजिटल अर्थव्यवस्थेचे  लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने  5 वर्षांच्या  योजनेचा अवलंब केला  जाईल, असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

गेल्या 7 वर्षात झालेल्या प्रगतीबद्दल बोलताना, राजीव चंद्रशेखर यांनी नमूद केले की, “2014  पूर्वी, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन जवळजवळ बंद  होते. 2014 पासून, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही दाखवून दिले आहे की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आपण सक्षम आहोत. जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत जरी आपला वाटा 1.5 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 3% आहे. मात्र आपण  1.9 लाख कोटी (2014) वरून 5 लाख कोटी (2019-20) पर्यंत मोठी  प्रगती केली आहे. “

ते पुढे म्हणाले की, कोविड  नंतरच्या काळात अनेक संधी उपलब्ध असून  जग नवीन आणि विश्वासार्ह पुरवठा साखळीचा  शोध घेत आहे. राजीव चंद्रशेखर हे गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विविध हितधारकांशी चर्चा करत आहेत. जागतिक  इलेक्ट्रॉनिक्स शिखर परिषदेत  त्यांनी शुल्क रचनेत आवश्यक  सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी सल्लागार बैठकांचे संकेत दिले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, राजीव चंद्रशेखर यांनी नमूद केले की भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी ही योग्य वेळ असल्याबाबत सरकार, उद्योग, निरीक्षक आणि भारतात गुंतवणूक करणारे लोक यांच्यात सहमती आहे. ते पुढे म्हणाले की 300 अब्ज डॉलर्स डिजिटल अर्थव्यवस्थेच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याच्या माध्यमांबद्दल भिन्न मते असू शकतात, परंतु ती गाठण्यासाठी सर्व हितधारकांचा उद्देश समान आहे.