वैजापूर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक: कांदयाचे भाव आणखी कोसळण्याची भीती

शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

वैजापूर ,​५​ मार्च / प्रतिनिधी :-वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यापासून लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु असून रांगडा कांदाही विक्रीसाठी येत आहे. या कांद्याची आवक आणखी महिनाभर सुरु राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा काढण्याचीही तयारी सुरु केली आहे‌. हा कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आल्यास मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढुन भाव आणखी कोसळण्याची भिती असल्याने कांदा उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. शासनाने लवकरात लवकर कांद्याच्या आयात निर्यातीचे धोरण जाहीर करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सहाशे रुपये अनुदान द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

कांदा उत्पादक कृती समितीने होळीच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना कांद्याची माळ घालून तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैजापूर तालुका हा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुका असून तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. यावर्षीही तालुक्यात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी नाफेडमार्फत अद्यापपर्यंत तालुक्यात एकही केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये आणावा लागत आहे. दररोज सरासरी सातशे वाहने विक्रीसाठी येत असून मागील काही दिवसांचा कालावधी सोडल्यास वाहनांची संख्या आता वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.‌

मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यात तीन हजार 151 वाहनातुन 143 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी कांद्याला अधिक तीन हजार पाचशे रुपये भाव मिळाला होता. मात्र जानेवारी महिन्यात तब्बल सात हजार 464 वाहनातुन एक हजार 530 क्विंटल कांद्याची आवक झाली व येथुनच भाव कोसळत्या सुरुवात झाली.‌ या दोन्ही महिन्यात कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल भाव मिळाला होता.‌ फेब्रुवारी महिन्यात वाहनांची संख्या पाच हजार 729 वर आली असली तरी आवक तब्बल आठ हजार 763 क्विंटल झाल्याने कांद्याचे भाव वेगाने कोसळले असुन या महिन्यात कांद्याला कमाल एक हजार दोनशे 55 रुपये व किमान केवळ 200 रुपये भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे. कांद्याला एकरी साठ हजार रुपये लागवड खर्च येत असुन मार्केटमध्ये आणेपर्यंत आणखी हजारो रुपये खर्च येतो. मात्र या कांद्याला केवळ दोनशे रुपये भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे असा सवाल शेतकरी विचारत आहेत. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत लाल कांद्याची मार्केटमध्ये आवक सुरु असते. पण यावर्षी मार्च महिना उजाडला तरी ही आवक सुरु असुन अजुन एक महिना पुरेल एव्हढा कांदा शेतकऱ्यांकडे आहे. उन्हाळी कांद्याची ही मोठ्या प्रमाणावर लागवड असुन हा कांदा काढणीस आला आहे.‌ त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर आणखी कोसळण्याची तीव्र शक्यता आहे.‌ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

————————————————————-

कांद्याच्या निर्यातीचे धोरण शासनाने लवकरात लवकर जाहीर करावे. अन्यथा उन्हाळी कांदा बाजारात आल्यास भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे.

धनंजय धोर्डे, शेतकरी नेते, डोणगाव

कांद्याचे भाव इतके कमी झाले आहेत का लागवडीचा खर्चही निघु शकत नाही. मी कांदा मार्केटमध्ये पंधरा क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला आहे. वाहतुक खर्चच एक हजार रुपये आहे.

देवदत्त गायकवाड, शेतकरी, चांडगाव

———————————————————————-