वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्रक्रिया ; पोटातील 2 किलो वजनाचा ट्यूमर काढला

वैजापूर,२१ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 44 वर्षीय महिलेच्या पोटातील दोन किलो वजनाचा टयुमर  काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ.गजानन टारपे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने केली.

शंभर खाटांच्या या  उपजिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुविधा मिळत नसल्याच्या नावाने कायम नाक तोंड वाकडे करणा-या मंडळीना रुग्णालया झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मोठी चपराक बसली. 

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मनिषा साहेबराव खोकले (44 वर्ष) या नातेवाईकांना भेटण्यासाठी वैजापूरला आल्या होत्या.त्यांच्या पोटात अचानक वेदना सुरु झाल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले..सुरुवातीला येथील वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला मात्र या महिलेची  आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे  व खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्याची विनंती नातलगांनी केली.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांना महिती दिल्यानंतर त्यांनी महिलेला पोटात वेदना कशामुळे सुरु झाली याचे निदान करण्यासाठी तातडीने सोनोग्राफी चाचणी केली. त्यात महिलेच्या गर्भाशयाच्या वरील भागावर मोठया आकाराचा गोळा दिसून आला.

महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ.गजानन टारपे यांनी घेतला. भूलतज्ज्ञ डॉ.यशपाल चंदे , डॉ.चंदाराणी पाटील, डॉ.आशिष पाटणी, डॉ श्रीमती पालवे, शेख रिझवान, डॉ अंधाळकर, डॉ.मुंडे, डॉ सोहेल यांच्या साहाय्याने दोन तासाच्या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून दोन किलो वजनाचा टयुमर यशस्वीपणे काढण्यात आला.या शस्त्रक्रियेमुळे महिलेच्या पोटातील वेदना नाहीशी झाली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे नातलगांनी सांगितले.