वैजापुरात धार्मिक स्थळाची मोडतोड अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल, शहरातील शांतता अबाधित

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  वैजापूर शहरातील येवला रस्त्यावरील धार्मिक स्थळाची मोडतोड करून धार्मिक भावना दुखावून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध बुधवारी (ता.21) वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

येवला रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे आदींनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जमा झालेल्या नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. मा.नगराध्यक्ष साबेर खान, माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख अकिल, काझी मलिक, सय्यद हिकमत, शेख रियाज,अमीर अली आदींनी शहरात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले.

याप्रकरणी फैजान शेख फरीद शेख यांच्या फिर्यादीवरुन वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहेत.