वैजापूर -गंगापूर चौफुलीवर टेम्पो व कारचा अपघात अपघातग्रस्त कारमध्ये गोमांस आढळले

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,१८ मे /प्रतिनिधी ;-आयशर टेंपो व स्वीफ्ट कारचा अपघात झाल्याचे कळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना कारमध्ये राज्यात बंदी असलेल्या गोवंश जातीचे दोन क्विंटल मांस आढळुन आले. मात्र अपघातानंतर पोलिसांच्या भितीने पसार झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई पोलिसांनी केली. त्यामुळे गोमांसाची वाहतुक करणाऱ्याचा लवकरच छडा लागणार आहे. 

नागपूर – मुंबई महामार्गावर गंगापूर चौफुलीवर शर्मा ऑटोमोबाईल्स जवळ आयशर टेंपो व स्वीफ्ट कारचा अपघात झाल्याची माहिती सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या आदेशाने गोपनीय शाखेचे अंमलदार संजय घुगे, प्रशांत गिते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गंगापूर चौफुली येथे एम. एच. 21 बी. एच. 2701 क्रमांकाचा आयशर टेंपो नादुरुस्त अवस्थेत कोपरगाव घ्या दिशेने तोंड करुन उभा होता व पाठीमागूनन स्विफ्ट कारने (क्रमांक एमएच ०४ इएच २१३७) धडक दिल्याचे दिसुन आले. कारच्या आजुबाजुला कुणीही नव्हते. मात्र कारमध्ये दोन क्विंटल गोंमास असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे याप्रकरणाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी घुगे यांच्या फिर्यादीवरुन कारच्या चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1995 सह भादवीच्या कलम 429 नुसार वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहेत.