वैजापुरच्या कांदा मार्केटमध्ये गोंधळ:लिलाव बंद करण्याची नामुष्की

वैजापूर ,१८ मे /प्रतिनिधी ;- दोन वाहनातून आलेला नो बीटचा (लिलाव योग्य नसलेला) कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वजन काट्यावर कांद्याचे वाहन पालथे केल्याने लिलाव बंद करण्याची नामुष्की बाजार समितीच्या प्रशासनावर आली.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नागपूर मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये मंगळवारी (ता.17) हा प्रकार उघडकीस आला. आधीच कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यातच कांदा खरेदीस व्यापाऱ्यांकडुन विरोध होत असल्याचे दिसताच शेतकऱ्यांचा पारा चढला. तर दुसरीकडे साठवणुकीतला हा कांदा खरेदी योग्य नसुन पुढे पाठविणेही व्यापाऱ्यांना परवडणारे नसल्याने हा कांदा कसा खरेदी करावा असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला होता. वैजापुरच्या कांदा मार्केटमध्ये सध्या उन्हाळ कांद्याची आवक सुरु असुन दररोज पाचशे ते सहाशे वाहनांची आवक सुरु आहे. कांद्याचे भाव दिवसागणिक कमी होत असल्याने व हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज व्यक्त केल्याने कांदा उत्पादकांनी चाळीत साठवुन ठेवलेला, काढणी झालेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे‌.

सध्या वैजापुरच्या कांदा मार्केटमध्ये प्रति क्विंटल दोनशे ते नऊशे रुपये भाव मिळत असून कांद्याच्या दर्जानुसार व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी होत आहे.‌ तालुक्यातील घायगाव येथील शेतकऱ्याने दोन वाहनांतून जवळपास दोन क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. परंतु हा कांदा नो बीटचा म्हणजेच लिलाव योग्य व खरेदी योग्य नसल्याने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली.‌ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपले वाहन थेट वजन काट्यावर नेऊन वाहन पालथे केले. त्यामुळे त्या ठिकाणी कांद्याचा सडा पडला होता. परिणामी बाजार समिती प्रशासनाने काही वेळासाठी कांद्याचे लिलाव बंद पाडले. अखेर अल्प दरात त्या कांद्याची खरेदी करुन शेतकऱ्याची समजुत काढण्यात आली. यातुन त्याचा वाहतुक खर्च तरी निघाला असेल कि नाही याची शाश्वती देता येऊ शकत नसल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलुन दाखवले. मात्र या प्रकारामुळे कांदा मार्केटमध्ये गोंधळ निर्माण होऊन काही वेळासाठी वातावरण तापले होते. त्यानंतर कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरु करण्यात आल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.