केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-केंद्र सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय दिला आहे. तसेच काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांबाबत संतुलन साधले आहे, अशा शब्दात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी पत आराखडा २० लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित करण्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज प्रणालीचा फायदा होऊन खासगी सावकारीपासून त्यांची सुटका होईल. शेतीपूरक उद्योगांसाठी अधिकचे भांडवल उपलब्ध होणार आहे.

नैसर्गिक शेतीला बळ देण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्यामुळे १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच ग्राहकांना सुद्धा विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे. याशिवाय साठवणूक सुविधा वाढविण्यावर या अर्थसंकल्पात भर दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवणूक करणे आणि योग्य भाव आल्यावर बाजारात विकणे शक्य होणार आहे.

शेतीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होणार आहे. मार्केट इंटलिजन्स स्टार्ट अप सपोर्ट उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.