वैजापूर तालुक्यात 55 हजार 366 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी ; कापूस, मका या रोख पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

वैजापूर ,२ जुलै  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात आतापर्यंत १०६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून खरीप पेरण्यांना वेग आला आहे.१ जूनपर्यंत खरिपाच्या १ लाख ३५ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रापैकी ५५ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
तालुक्यातील कृषी मंडळामध्ये बहुतांश भागामध्ये सुरवातीचं पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यातील शेतकरीवर्गाने कमी पाण्याच्या पिकांशी पेरणी मोठ्याप्रमाणामध्ये केली आहे.यंदा बाजारामध्ये मका, कापुस, सोयाबिन या पिकांसह सर्वच भुसार भावालाही चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा कल कापुस, मका या रोख पिकांशिवाय सोयाबीनकडेही आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात मकाच्या क्षेत्रात किंचित घट होऊन कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील वैजापूर, लाडगाव, नागमठाण, महालगाव, लासुरगाव, लोणी, शिऊर, गारज, बोरसर, खंडाळा या मंडळात १ जुलै पर्यंत सरासरी १०६.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पेरणी करण्यासाठी सरासरी ७५ ते १०० मिमी पावसाची आवश्यकता असते पेरणी योग्य पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पिक लागवडीसाठी धावपळ सुरु आलेली आहे.१ जुलै अखेरीस तालूक्यातील वैजापूर कृषी मंडळात सरासरी १०६.९ मि.मी पाऊस झाला असून यामध्ये वैजापूर १४५ मि.मी,लाडगाव १०५ मि.मी,नागमठाण ९२ मि.मी.महालगाव १४६ मि.मी,लासुरगाव ११२ मि.मी,लोणी ११८ मि.मी,शिऊर ८६ मि.मी,गरज ७४ मि.मी,बोरसर ८८ मि.मी,खंडाळा १०३ मि.मी एवढा मंडळनिहाय पाऊस झालेला आहे. 

तालुक्यामध्ये एकून पेरणी क्षेत्र १ लाख ३५ हजार ६८५ हेक्टर असून यामधून ५५३६६ हेक्टर पेरणी झली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी दिली.यामध्ये कपाशीचे ६५ हजार क्षेत्रापैकी ३० हजार ६९३ हेक्टर क्षेत्र, मका ३७ हजार ६२२ हेक्टर पैकी १६ हजार ९३८ हेक्टर वर पेरणी, बाजरी चार हजार ७५९ हेक्टर पैकी १३७२ हेक्टर वर पेरणी, सोयाबीन पाच हजार ७१३ हेक्टर पैकी १६३१ हेक्टर वर पेरणी, भुईमुग दोन हजार ३९६ हेक्टर पैकी ७८७ हेक्टर पेरणी, मुग चार हजार १८ हेक्टर पैकी १४८८ हेक्टर वर पेरणी व उडीद ७८ हेक्टर क्षेत्र पैकी ५५ हेक्टर वर पेरणी झालेली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.कृषी अधिकारी आढाव यांनी तालुक्यामध्ये पुरेसे बियाणे व खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी दुकानदाराकडूनच बियाणे, खते व औषधी खरेदी करावेत. दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे. बॅग वरील किमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाण्याची पिशवी, लेबल व बिल जपून ठेवावे. बियाणे/खते/औषधी बाबत काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. पेरणी करताना रासायनिक, तसेच जैविक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खतांचा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार संतुलित वापर करावा असे आवाहन केले.