वैजापूर-गंगापूर-येवला रस्त्यावर वाढते अपघात ; शहरात स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज

वैजापूर, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- रस्ते हे विकासाचे मार्ग ठरतात. हेच खरं. परंतु वैजापूर शहरातून जाणारे औरंगाबाद-नाशिक, वैजापूर – गंगापूर व इतर महामार्गाचे रुंदीकरण होऊन नवीन गुळगुळीत रस्ते तयार झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. वेगाबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढले असून शहरातून जाणाऱ्या या राष्टीय स्पीडब्रेकर टाकण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच शहरातून जाणाऱ्या गंगापूर व औरंगाबाद रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली असून वाहतूक कोंडी निर्माण होते. भरवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

मागील काही महिन्यांपासून भेंडाळा फाटा ,गंगापूर ते वैजापूर हा चार पदरी रस्ता चांगला झाल्यापासून अवजड व इतर वाहनांची संख्या वाढल्याने अपघातही वाढले. हे तितकचं खरं.

चांगला रस्ता झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. अपघातात अनेक कुटुंबातील कुटुंबप्रमुख, सदस्य यांचा मृत्यू झाला. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. कुटुंबप्रमुखच अपघातात गेला तर कुटुंब उद्ध्वस्त होते. अपघातात झाला की रस्ते अपघातावर बरीच चर्चा होताना दिसते .यावर मात्र उपाय केले जात नाही. वाहनचालकांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावे याकडे दुर्लक्ष केले जाते. वाहतूक शाखा नावालाच आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोटर सायकलसाठी चार फुटाचा पट्टा दिलेला आहे तरी मोटरसायकलस्वार त्याचा वापर करत नाही. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर , येवला रोडवरील भाजी मंडई, गंगापूर चौफुली तसेच स्टेशन रस्त्यावरील सेंट मोनिका शाळेजवळ स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मलिक काझी, रहीम खान, सुलतान खान आदींनी केली आहे.