वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्ष व नगरसेवकांची मुदत १० मे रोजी संपली ; पालिकेवर प्रशासक येणार

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेत निवडून आलेल्या नगराध्यक्ष व २३​ नगरसेवकांचा कार्यकाळ आज बुधवारी रोजी संपला. त्यामुळे नगरपालिकेत कार्यरत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक व विविध समित्यांचे पदाधिकारी यांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. नगरपालिकेचा कारभार चालविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या इतिहासात उपविभागिय अधिकारी यांनी प्रशासकाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे आता पालिकेवर प्रशासक म्हणुन कुणाची नियुक्ती होणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणावरून दाखल याचिका न्यायप्रविष्ट असल्याने राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समितीसह नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. याबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा निकाल जुलै महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच निवडणुक आयोगाकडून निवडणुकीबाबत अधिसुचना प्रसिद्ध होण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक झाल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या वैजापूर नगरपालिकेत अकरा प्रभागात एकुण तेवीस नगरसेवक असून यात नगराध्यक्षांसह भाजपाचे ९, कॉग्रेसचा एक व शिवसेनेचे तेरा असे पक्षीय बलाबल आहे.