वैजापूर तालुक्यातील कर्ज मागणीच्या प्रलंबित अर्जाविषयी बँक अधिकाऱ्यांची 7 ऑक्टोबरला बैठक

वैजापूर,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक व शेतकरी यांचे कर्ज मागणीचे अर्ज वेगवेगळ्या बँकेत अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.या संबंधी “फायनान्सशियल इंप्लुएजन” करण्यासाठी सर्व बँकांची तात्काळ बैठक उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी 7ऑक्टोबर 2022 रोजी बोलावली आहे.

राज्याचे माजी उद्योग संचालक तथा मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे.के.जाधव यांच्या विनंतीवरून ही बैठक बोलाविण्यात आली आहे. अनेक युवकांना बेरोजगारीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेरोजगारीमुळे युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात किंवा आत्महत्या करतात. युवकांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे यासाठी 24 सप्टेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जे.के.नॉलेज सेंटर चिकलठाणा औरंगाबाद येथे केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व लीड बँक मॅनेजर श्री. केदारे यांच्या उपस्थितीत युवकांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक व शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणासंदर्भात चर्चा  करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलवावी असे सुचविण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबादचे लीड बँक मॅनेजर श्री. केदारे यांनी सूचित केल्याप्रमाणे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.