वैजापूर -गंगापूर रस्त्यावर शिवशाही बस व कारच्या धडकेत पती-पत्नी ठार तर मुलगा व सून जखमी

वैजापूर ,​५​जून/ प्रतिनिधी :-शिवशाही बस व स्विफ्ट कारच्या धडकेत कारमधील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यु झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.‌ ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वैजापूर-गंगापूर रस्त्यावर चोरवाघलगावजवळ घडली. मृतांमध्ये आई वडीलांचा समावेश असुन मुलगा व सुन हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील देवगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हंसराज नामदेव पवार (६२वर्ष) व सुलोचना हंसराज पवार (५९ वर्ष) रा. मर्चंट कॉलनी, वैजापूर अशी मृतांची नावे असुन मनोज हंसराज पवार व माया मनोज पवार हे पती पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

हंसराज पवार हे वैजापुर येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी होते. २०१९ मध्ये ते सेवेतुन निवृत्त झाले होते. कुटूंबातील चारही सदस्य स्विफ्ट कारने (एमएच ०४ जिथे २५९५) औरंगाबाद येथुन वैजापुरला येत होते. गंगापूर रस्त्यावर चोरवाघलगावजवळ आल्यानंतर नाशिक -संभाजीनगर शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यु ०४९१) त्यांना जोराची धडक दिली. समोरुन येणऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात शिवशाहीने कारला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची तीव्रता एव्हढी होती की कारचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर तेथील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना वैजापुरच्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. हंसराज हे मुळ नांदगाव तालुक्यातील बांधटाकळी येथील रहिवासी होते. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.