वैजापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळू माफियाविरुद्ध कारवाईची बहुजन समाज पार्टीची मागणी

वैजापूर,१५ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिवना नदीच्या पात्रात कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळू माफियाविरुद्ध आट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टी वैजापूरच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती यांना निवेदन देण्यात आले आहे. वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यावर शिवना नदीपात्रात जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा 24 मार्च रोजी प्रशासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.  यावेळी बहुजन समाज पार्टी वैजापूर विधानसभा सचिव वाल्मिक वाघ, शहराध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन, जिल्हा सचिव राजेश नरवडे पाटील, वाल्मिक त्रिभुवन, किरण पवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.