वैजापूर तालुक्यात ८०० पैकी केवळ ७५ रोहित्रांची कामे पूर्ण ; शेतकऱ्यांसाठी मंजूर स्वतंत्र रोहित्रांची योजना रेंगाळली

शेतकरी डीपीच्या प्रतिक्षेत

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- महावितरणच्या वैजापूर उपविभागातर्गंत  शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र रोहित्राची ( सिंगल ट्रान्सफार्मर ) योजना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेंगाळली आहे. या योजनेअंतर्गत महावितरणच्या उपविभाग क्रमांक एक अंतर्गत ८०० मंजुर रोहित्रांपैकी केवळ ७५ रोहित्र बसवण्याची कामे झाली आहेत. त्यामुळे उर्वरित कामे कधी होणार असा प्रश्न आहे.

बीड येथील मृत्युंजय इन्फ्रा लिमिटेड व उस्मानाबादच्या सुदर्शन इलेक्ट्रिकल्स यासह तीन कंत्राटदार कंपन्यांना रोहित्र बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, रोहित्र बसवण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. महावितरणने हे कंत्राटदार त्वरित बदलावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   महावितरण कंपनीमार्फत शेतकऱ्यांसाठी ‘एक शेतकरी, एक रोहित्र’ अशी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी मुबलक व उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा. या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे.

सन २०१८ ते २०२२ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र रोहित्रासाठी कोटेशन भरले होते. अशा ८०० शेतकऱ्यांच्या रोहित्रांच्या कामाची निविदा काढून ही संबंधित यंत्रणेला वाटप करण्यात आली. रोहित्रे बसविण्याच्या कामांना एक एप्रिलपासून सुरवात झाली. एप्रिल व मे अशा दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ ७५ रोहित्र बसविण्यात आली आहेत.‌ विद्युत खांब उपलब्ध नसल्याची तक्रार कंत्राटदारांनी केली आहे तर दुसरीकडे अशी काही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उपकार्यकारी अभियंत्यांनी कामास विलंब होत असल्याबाबत त्यांना लेखी पत्र काढले आहे. तरीही कामावर परिणाम झाला नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही ठिकाणी खांब उभे करण्यात आले तर विद्युत वाहिन्या व रोहित्र  बसविणे अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे स्वतंत्र रोहित्र कधी बसवणार असा प्रश्न आहे.

———————————————————

” स्वतंत्र रोहित्र बसविण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे आम्ही कंत्राटदारांना पत्र काढले आहे. वास्तविक पाहता ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. “

     – राहुल बडवे, उपकार्यकारी अभियंता, वैजापूर

——————————————————