वैजापूर तालुक्यात १ लाख ३५ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन ; बळीराजा मशागतीच्या कामाला

51 हजार 897 मेट्रिक टन खताचे आवंटण मंजूर

जफर ए.खान 

वैजापूर ,​१ जून​:- 

रब्बी हंगाम आता संपल्यात जमा असून शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. गतवर्षी झालेले नुकसान बाजूला सारुन पुन्हा बळीराजा जोमाने कामाला लागला आहे. खरीप हंगाम अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने नांगरणी, मोगडणे ही कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत. मशागतीची कामे खर्चीक असली तरी  उत्पादन वाढीसाठी शेतकरी कोणतीही तडजोड करीत नाही. यंदाही खरिपात कापसावर शेतकऱ्यांचा भर राहील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मका पिकाचेही क्षेत्र वाढेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. खरिपाच्या अनुशंगाने आतापर्यंत तर सर्वकाही नियोजनानुसार सुरु असून वेळेत पाऊस झाला तर जून महिन्यात चाढ्यावर मूठ ठेवली जाईल यामध्ये शंका नाही.  म्हणून दरवर्षी मशागतीची कामे रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच शेती मशागतीच्या कामांना सुरवात केली जाते. यामध्ये शेत जमिन नांगरून पुन्हा ती मोगडणे व पाळी घालणे यामुळे जमिन पेरणीयोग्य तर होतेच पण पीक बहरण्यासही मदत होते. रब्बी हंगामातील पीक काढणीनंतर लागलीच नांगरणीची कामे सुरु आहेत. तालुक्यात भर उन्हामध्ये शेती मशागतीची घाईगडबड पाहवयास मिळत आहे. मशागतीमुळे जमिनीचा पोत वाढतो व उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वैजापूर तालुक्यात खरीप पिकांचे लागवडी खालील क्षेत्र १ लाख ३५ हजार ५८६ हेक्टर इतके आहे.  तालुक्यात प्रामुख्याने  कापूस, मका, बाजरी, कांदा, तुर, भुईमूग,सोयाबीन आदी पिके घेतली जातात. सर्वाधिक क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. त्या खालोखाल मका पीक घेतले जाते.

शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी

ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामे न करता वेळीच नांगरण, मोगडण ही कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत. यामुळे उन्हा लागल्याने जमिनीचा पोत वाढतो तर नांगरणीनंतरची मशागतही चांगली होते. पेरणी दरम्यान शेतजमिन भुसभुशीत असल्याने पीके जोमाने वाढतात तर पावसाच्या पाण्याचा निचराही होतो. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत ही महत्वाची असून शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने मशागत करुन घेतली तर त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होणार आहे.

ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे असे वाढले दर

खरिपातील पेरण्या होण्यापूरर्वी शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करावी लागतात. यासाठी आता सर्रास ट्रॅक्टरचाच वापर होत आहे. गतवर्षी ट्रक्टरने नांगरट आणि जमिन रोटरण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 1 हजार 800 रुपये मोजावे लागले होते यंदा मात्र, 2 हजार 500 रुपये द्यावे लागत आहेत. महागाईचा फटका थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे तर दुसरीकडे शेतीमालाच्या किंमती त्या तुलनेत वाढलेल्या नाहीत.

खतांची मागणी

वैजापूर कृषी विभागाने ५८,४११ मेट्रिक टन खताची मागणी केली आहे.मात्र प्रत्यक्षात ५१ हजार ८९७ मॅटिक  टन खताचे आवंटण मंजूर झाले आहे. खतामध्ये युरीया, डी ए पी, एस एस पी,एम ओ पी व संयुक्त खतांचा समावेश आहे.