कौतुकास्पद: वैजापूरच्या रश्मी कुमावतची आकाश ‘भरारी”

ग्रामीण भागातील पहिलीच हवाई सुंदरी

वैजापूर ,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूरसारख्या ग्रामीण भागात राहूनही एका तरुणीने आकाश ‘भरारी’ घेतली आहे. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न बाळगून ते  सत्यात उतरविण्याची प्रत्यक्ष किमया वैजापूर येथील रश्मी गोपाल कुमावत हिने करून दाखविली आहे. तिची इंडिगो एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी ( एअर होस्टेस ) म्हणून निवड झाली आहे.वैजापूर तालुक्यातील ती पहिलीच हवाई सुंदरी ठरली आहे. 

    आजकालच्या तरुणी विविध क्षेत्रात उंच भरारी घेताना दिसताहेत. करिअर बनविण्याच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या तरुणींना गांभीर्य आहे. वैजापूरसारख्या ठिकाणी राहून रश्मी कुमावत हिच्यासाठी हवाई सुंदरी बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे नक्कीच मैलाचा दगड होता. वडिल गोपाल कुमावत व्यवसायिक, आई मंजू कुमावत गृहिणी असून पाहिजे तितके शैक्षणिक वातावरण नसतानाही तिने मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. शालेय शिक्षण सेंट मोनिका इंग्लिश शाळेत, त्यानंतर शहरानजीकच्या एका इंस्टीट्यूटमध्ये पदवी घेऊन औरंगाबाद येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई.ची पदविका प्राप्त केली. परंतु पदविका प्राप्त करून या क्षेत्रात फारसे भवितव्य वाटत नसल्याने तिने वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती घेऊन प्रयत्न सुरू केले. ऑनलाईन अर्ज करण्यासह परीक्षाही दिल्या. परंतु यश अजूनही पथ्यात दिसायला तयार नाही. परंतु दरम्यानच्या काळात इंडिगो एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी पदासाठी अर्ज केला असल्याने एक दिवस तिला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले अन् तिला आकाश ठेंगणे वाटू लागले. मुलाखतीनंतरही बराच पल्ला गाठायचा होता. परंतु मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याचा आनंद तिच्यासह घरातील सदस्यांना जास्त होता. 3 ऑगस्ट 2022 रोजी तिला मुलाखतीसाठी पुणे येथे बोलावण्यात येऊन तिची पुढील प्रशिक्षणासाठी निवडही झाली. त्यानंतर तिला बँगलोर येथील आयफ्लाय ट्रेनिंग इंस्टीट्यूटमध्ये  तीन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. 11 जानेवारी 2023 रोजी तिचे प्रशिक्षण पूर्ण होऊन तिला 1 फेब्रुवारी रोजी प्रथम मुंबई – दिल्ली व गोवा फ्लाईट मिळाले. रश्मीने ग्रामीण भागात राहूनही तिने मारलेली ही मजल कौतुकास्पद तर आहेच. परंतु ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी आहे. वैजापूर तालुक्यातून हवाई सुंदरी होण्याचा पहिलाच मान तिने मिळविला आहे.   ग्रामीण भागातील तरुणींमध्ये न्यूनगंड बघावयास मिळतो. वास्तविक पाहता आपण शहरात वाढलो की खेड्यात? हा प्रश्न महत्त्वाचा नसून जिद्द ,चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर आकाशाला ‘गवसणी’ घालणे अवघड नसते. हेच तिने सिद्ध करून दाखविले. 

सुरवातीच्या काळात मी पुणे येथे यासंदर्भात काही महिन्यांसाठी शिक्षण घेतले होते. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. 2020 – 21 मध्ये कोरोना महामारीमुळे एअरलाईन्समध्ये पदभरती बंद होती. त्यामुळे दोन वर्षे वाया गेले. एअर होस्टेस होण्यासाठी आईवडीलांसह भाऊ शुभम याने प्रोत्साहन देऊन शेवटपर्यंत साथ दिली. सातत्याचे प्रयत्न, चिकाटी, घरातून प्रोत्साहन मिळाले तर यश हमखास मिळते. 

 – रश्मी कुमावत, एअर होस्टेस, वैजापूर