शिल्लक ऊसाच्या गाळपासाठी तातडीने नियोजन करा ; उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांचे कारखान्यांना निर्देश

वैजापूर ,१५ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर तालुक्यातील तोडणी व गाळपाअभावी शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे गाळपासाठी तातडीने नियोजन करा असे निर्देश उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांनी परिसरातील साखर कारखान्यांना दिले आहेत.

याबाबत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी (कोपरगाव) कोळपेवाडी (कोपरगाव), विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर) व संगमनेर येथील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तालुक्यात तोडणी न झालेला व पर्यायाने गाळपा अभावी शेतात उभ्या असलेल्या ऊसाबाबत प्रशासकिय स्तरावर हालचाली केल्यानंतर उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांनी वरील आदेश पारीत केले.

वैजापूर मतदार संघात सध्या अतिरिक्त ऊस तोडणीचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक चिंतेत असुन या ऊसाचे कारखान्यांनी गाळप न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. या अनुषंगाने आमदार रमेश बोरनारे यांनी प्रशासनाला हे पत्र पाठवुन अवगत केले होते. वैजापूर तालुक्यातील ऊस हा मागील वीस वर्षांपासुन संजीवनी, कोळपेवाडी, प्रवरा, संगमनेर येथील साखर कारखाने गाळपासाठी घेऊन जातात. वैजापूर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड क्षेत्र असल्यामुळे यावर्षी अनेक कारखान्यांनी अतिरिक्त ऊस गाळपासाठी नेला नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी चिंतातुर आहे. या अतिरिक्त ऊस तोडणीसाठी कारखान्यासोबत साखर आयुक्तांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावुन ऊस तोडणी बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणी बाबत संबंधित कारखान्यात नोंदणी केली आहे. मात्र आजही मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी अभावी व गाळपाअभावी शेतात उभा आहे. हा ऊस गाळपासाठी घेऊन जाण्याचे आदेश कारखाना व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

16 मे रोजी बैठक
वरील प्रश्नांच्या अनुषंगाने वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 मे रोजी दुपारी तीन वाजता येथील उपविभागिय अधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला कारखाना प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.