भाव घसरल्याने करंजगाव येथे मनसेतर्फे रस्त्यावर दुधाचा अभिषेक करून निषेध

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- दुधाचे भाव बसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वैजापूर तालुक्यातील करंजगाव फाटा येथे गुरुवारी रस्त्यावर दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे पाटील व जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाळुंज यांनी शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन केले. दुधाच्या दरात मागील चार महिन्यात पाच रुपयांची तफावत झाली असून हे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मोठ्या काबाडकष्टाने पशुधन जपत बळीराजा शेतीपुरक व्यवसाय करत असतांना दुध खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी अचानक भाव कमी केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रस्ता रोको आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी दिलीप आवारे व अनिल वाळुंज यांना अक्षरशः दुधाच्या कॅन रिकाम्या करत अभिषेक केल्याने रस्त्यावर सर्वत्र दूध सांडल्याचे दिसून आले. या आंदोलनामुळे दूध उत्पादक शेतकरी अधिकच आक्रमक झाला आहे.