हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर वीरगाव पोलिसांची कारवाई ;१० हजारांचा दंड वसूल

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणा-या दुचाकीस्वारावर वीरगाव पोलिसांनी बुधवारी दंडात्मक कारवाई केली. वैजापूर – गंगापूर रस्त्यावरील चिंचडगाव येथे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने २० दुचाकीस्वाराकडून १० हजारांचा दंड आकारण्याची कारवाई केली. तसेच एका दुचाकी स्वाराने वाहनाचे कागदपत्रे सादर न केल्यामुळे वाहन जप्त करण्यात आले.

दरम्यान रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील ठाणे हद्दीत हेल्मेटचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीमेचा दुचाकीस्वारानी चांगलाच धसका घेतला आहे.रस्त्यावर कुठे पोलिस कारवाईसाठी उभे आहेत यांचा अंदाज घेऊन दुचाकीस्वार रस्त्यावर वाहने दामटवित आहेत.दोन दिवसात शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी ५० हजाराचा दंड वसूल केला.