घायगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ ; शेतवस्तीवर दरोडा टाकून 61 हजारांचा माल लंपास मारहाणीत एक जण जखमी

वैजापूर ,१८ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारातील शेतवस्तीवर चार अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. लाकडी दांडा व चाकूचा धाक दाखवून व मारहाण करुन दरोडा टाकला.‌ या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून दऱडेखोरांनी दोन घरातून एक हजार रुपये रोख व साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेत सतीष गुलाबराव जाधव (45) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी वैजापूच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे घायगाव परिसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे. वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारात गट क्रमांक 212 मध्ये सतीष जाधव हे पत्नी भिमाबाई, कोमल व कल्याणी या दोन मुली व मंगेश या मूलासह राहतात. शुक्रवारी रात्री ते मुलगा मंगेश यांच्यासोबत घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते तर पत्नी भिमाबाई या दोन मुलींसह घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास काही तरी आवाज झाला म्हणुन त्यांनी पाहिले असता चार 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुण हातात काठी, कुऱ्हाड व चाकू घेऊन जवळ आले. आवाज करु नका असे म्हणून चाकूचा धाक दाखवला व आरडाओरड करताच त्यातील एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात जबर वार करुन जखमी केले. पत्नी व मुलींनीही आरडाओरड केली. त्यांनी घरात घुसुन पत्नी व मुलींना चाकुचा धाक दाखवला व पत्नीला दांड्याने मारुन तिच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कपाटातील रोख एक हजार रुपये चोरले. याबाबत कुणाला सांगु नका, नाही तर जीवे मारुन टाकू अशी धमकी देऊन पोबारा केला. याआधी त्यांनी घायगाव शिवारात राहणाऱ्या प्रकाश भुसारे यांच्या घरातुन तीस हजार रुपये किमतीची सोन्याची एकदाची चोरली. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते पण श्वानाने केवळ समृद्धी महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌