लोखंडी गजाने मारहाण करुन तरुणाचा खून,आरोपीचा नियमित जामीन फेटाळला

औरंगाबाद ,१० मे /प्रतिनिधी :- घराकडे एकटक का बघतो असे म्हणत तरुणाला लोखंडी गजाने मारहाण करुन त्‍याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय रावसाहेब गटकळ (५४, रा. ७४ जळगाव ता. पैठण) याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.ए. कुलकर्णी यांनी नामंजूर केला.

या प्रकरणात मृत संतोष प्रकाश एरंडे (३०) याची आई मंदाबाई एरंडे (५०) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, ८ एप्रिल रोजी सायंकाळी फिर्यादी या घरासमोर वाळत घातलेला गहु भरत असताना गावतील मंदरीजवळ संतोषच्‍या ओरडण्‍याचा आवाज आला. त्‍यामुळे फिर्यादी या त्‍या दिशेने पळत सुटल्या तेंव्‍हा आरोपी संजय गटकाळ आणि त्‍याची दोन्‍ही मुले जीवन व वैभव असे तिघे संतोषला शिवीगाळ करुन लाथाबु्क्क्यांनी मारहाण करतांना दिसले. फिर्यादीने संतोषला सोडण्‍याचा प्रयत्‍न केला असता आरोपीने त्‍यांना ढकलून देत आमच्‍या घराकडे एकटक पाहत जावू नकोस असे बर्याच वेळा सांगुन सुध्‍दा तो घराकडे एकटक पाहत असतो असे म्हणत आज त्‍याला जीवंत सोडणार नाही असे म्हणुन लोखंडी गजाने बेदम मारहाण करित होते. फिर्यादीने विनवण्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र आरोपी जीवन गटकाळ याने संतोषच्‍या डोक्यात लोखंडी गज मारुन जबर जखमी केले. संतोष बेशुध्‍द अवस्‍थेत पडलेला असताना देखील तिघे आरोपी त्‍याला गजाने मारहाण करित होते. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोषचा १२ एप्रिल रोजी उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. या प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन आरोपी जीवन आणि वैभव या दोघांना १० तर संजय गटकळ याला ११ एप्रिल रोजी अटक केली. न्‍यायालयाने तिघा आरोपींची पोलीस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपी संजय गटकळ याने नियमित जामीनासाठी अर्ज सादर केला होता.या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी काम पाहिले.