राज्य राखीव पोलिस भरती ;परिक्षार्थी सचिन लांडगेला अटक

औरंगाबाद ,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्य राखीव पोलीस बल विभागासाठी सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी झालेल्या परिक्षेत डमी उमेदवार बसवून मैदानी व लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थीला एमआयडीसी वाळुज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे हा प्रकार परिक्षावेळी घेण्‍यात आलेल्या व्हिडीओ शुटींग वरून उघडकीस आला आहे. सचिन सुरेश लांडगे (रा. उंडणगाव ता. सिल्लोड) असे परिक्षार्थीचे नाव असून त्‍याला सोमवारपर्यंत (दि.१७) पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शनिवारी दि.१५ दिले.

या प्रकरणात राज्य राखीव दलाचे निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे (५२) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, एसआरपीएफ ग्रुप क्रं.७ (ता. दौंड जि. पुणे) येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.१९ (कुसडगाव ता. जामखेडा जि. अहमदनगर) या आस्‍थापनेवर सशस्‍त्र पोलीस शिपाई पदांसाठी २०१९ मध्‍ये प्रक्रिया राबविण्‍यात आली होती. या प्रक्रियेत सर्व परिक्षांचे व्‍हीडीओ शुटींग करण्‍यात आली होती. ३१ डिसेंबर २०२१ रोजी मैदाणी आणि लेखी परिक्षेत उर्तिण झालेल्या उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी संकेत स्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली. दरम्यान ११ जानेवारी रोजी निवड यादी आणि प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी दिलेल्या लेखी आणि मैदानी चाचणीचे व्हिडीओ शुटींग तपसाण्‍यात आले. त्‍यात राजे शहाजी ज्युनिअर कॉलेज (अंबेलोहळ ता. गंगापुर) या परिक्षा केंद्रावर सचिन लांडगे या परिक्षार्थीने त्‍याच्‍याऐवजी डमी उमेदवार बसवून लेखी परिक्षा दिल्याचे समोर आले. प्रकरणात ऑनलाईन तक्रार देण्‍यात आल्यानंतर नागपुर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला. त्‍यानंतर तो गुन्‍हा झिरोने एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्‍यात वर्ग करण्‍यात आला.

आरोपीला अटक केल्यानंतर त्‍याने लेखी कबुली दिली. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीने बसविलेल्या डमी उमेदरावाला अटक करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी न्‍यायालयाकडे केली.