ब्रम्हलिन गंगागिरी महाराज यांचा १७६ वा सप्ताह वैजापुरात होणार ;लाडगाव चौफुलीवर जागेची निवड

१७७ एकर जागेवर होणार भव्यदिव्य सप्ताह

वैजापूर ,​८ ​जून/ प्रतिनिधी :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट (गोदाधाम) चे मठाधिपती ब्रम्हलिन गंगागिरी महाराज यांच्या १७६व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे यजमानपद वैजापूर शहराला मिळाले असून या सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी गुरुवारी बेटाचे महंत रामगिरी महाराज, वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, मर्चंट बॅंकेचे चेअरमन विशाल संचेती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडगाव चौफुली येथे नागपूर-मुंबई महामार्गालगतच्या जागेची पाहणी करण्यात आली.

याठिकाणी सहा वेगवेगळ्या गटातील सुमारे १७७ एकरमध्ये सप्ताहासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. यात सभामंडप, किर्तन मंडप, स्वयंपाक घर, वाहन व्यवस्था आदी व्यवस्था करण्यासाठी पाहणी करण्यात आली. आमदार रमेश बोरणारे यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, भक्तगण आदींनी जागेच्या ठिकाणी सभा मंडप कुठे असावा, वाहतुक व्यवस्था, स्वयंपाक घर आदी व्यवस्था  कुठे व कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत चर्चा केली. त्यानंतर लाडगाव रस्त्यावरील सुभद्रा लॉन्स येथे बैठक झाली. यावेळी आमदार रमेश बोरणारे यांच्यासह मान्यवरांनी महाराजांचे पुजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी हा सप्ताह सर्वांना विश्वासात घेऊन यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. महंत रामगिरी महाराज यांनी मार्गदर्शन करताना सप्ताहाची तयारी करण्याचे संकेत दिले.

आषाढ वैद्य एकादशीला पुणतांबा येथे होत असलेल्या कार्यक्रमात सप्ताहाचा नारळ दिला जाईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र यावे. आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही व विरोधकही नाही. त्यामुळे यात राजकारण न करता हा सप्ताह पार पाडावा असे ते म्हणाले. सराला बेटाचे सर्वाधिक सप्ताह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. सप्ताहासाठी जागा पाहणी झाली असून लाडगाव चौफुली येथे निवडलेली जागा ही सर्वांसाठी सोयीस्कर असल्याने हीच जागा अंतिम करु असे महाराज म्हणाले. यापूर्वी सन २००० मध्ये  माजी आमदार दिवंगत आर.एम.वाणी व माजी  नगराध्यक्ष साबेर खान यांनी सप्ताहाचे योग्यप्रकारे नियोजन केले होते अशी आठवण महाराजांनी  सांगितली. यावेळी बाजार समितीचे संचालक कल्याण जगताप, पारस घाटे, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, रहीम खान, महेश बुणगे, वसंत त्रिभुवन आदींसह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.