अखेर वैजापूरचे अभय पाटील चिकटगावकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Image
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना धक्का

वैजापूर ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेल्या मुस्कटदाबीला कंटाळून औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर यांनी अखेर “राष्ट्रवादीला” रामराम ठोकला. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षापेक्षा काका माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी माघार घेऊन पुतण्या अभय पाटील चिकटगांवकर यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले होते.या निवडणुकीत अभय पाटलांचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून काका व पुतण्यामध्ये बेबनाव होता.अभय पाटील यांची पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजेरी रहात असे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे औरंगाबादला आले असता अभय पाटील यांनी आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला होता. तेव्हापासून अभय पाटील हे भाजपात प्रवेश घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर आज भाजप प्रवेशाचा मुहूर्त अभय पाटलांना सापडला.

Image

माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसराजआप्पा मंगरुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश झाला.