वैजापूर पालिकेची कर वसुली मोहीम: 83 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले तर चार दुकानांना सील

वैजापूर ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. नगरपालिकेने विकसित केलेले रोटेगाव स्टेशन रस्त्यावरील बाळासाहेब पवार व्यापारी संकुलातील चार व्यापाऱ्यांनी पालिकेचा भाडेपट्टा आणि मालमत्ता कराचे 6 लाख 63 हजार 825 रुपयांचा थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या नेतृत्वात पथकाने मंगळवारी दुपारी दुकानांना कुलूप ठाेकले.

नोटिसा देत थकबाकी रक्कम जमा करण्याची मागणी करूनही प्रतिसाद देत नसल्याने 83 घरांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी नळ जोडणी खंडित केली. पालिकेच्या कै. बाळासाहेब पवार व्यापारी संकुलातील चार व्यापाऱ्यांकडे 5 लाख 75 हजार 253 व मालमत्ता कर 88 हजार 572 असे एकूण 6 लाख 63 हजार 825 थकीत रकमेसाठी दुकाने सील केली. थकबाकीदारांनी भाडेपट्टा व मालमत्ता रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलावाद्वारे थकबाकी वसूल करण्यात येईल, अशी ताकीद थकबाकीदारांना दिली आहे. ही कारवाईत मुख्याधिकारी बिघोत, उपमुख्याधिकारी आर. डी. साठे यांच्या मार्गदर्शनात वसुली पथकातील कर निरीक्षक जी. के. गंगावणे, कार्यालय अधीक्षक किरण गांगुर्डे, मिलिंद साळवे, विलास गडकर, जगन्नाथ ननवरे, अशोक वाणी, इलियास खान, संजय जेजुरकर, मदन शेळके, सुशील बागुल, नंदू हरिदास, सुदेश त्रिभुवन, शुभम जोशी, वाल्मीक मोरे, सुखदेव त्रिभुवन, वाल्मीक वाणी यांच्या पथकाने केली.