पारळा येथे सावरदरा खोल दरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत अविवाहित तरुणीचा मृतदेह आढळला

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील सावरदरा खोल दरीत एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील आढळलेला  मृतदेह हा अविवाहित तरुणीचा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा मृतदेह पारळा शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी वनरक्षक अनुसया चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला शिवूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

त्यानंतर  छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवण्यात आला होता. घाटी रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून सदर मृतदेह हा एका अविवाहित तरुणीचा असल्याचे निदर्शनास आले आहे.सदर युवतीचे वय २० ते ३० वर्षा दरम्यान असून तिचा खून झाला आहे.पोलीसांनी या प्रकरणी खुनाची नोंद केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.या प्रकरणी काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.असे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी केले आहे