वैजापूर कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी ; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

वैजापूर ,​३०​ मार्च / प्रतिनिधी :-कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर करताच अडत व्यापाऱ्यांनी बुधवारी कांदा कवडीमोल भावाने खरेदी करून अक्षरशः ‘शिकार’ केली. येथील कांदा बाजारात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हिच संधी साधून अडिचशे रुपयांपासून ते रुपये प्रति क्विंटल दराने कांदा लिलावात बोली सुरू केली. व्यापाऱ्यांचे संगनमत पाहून शेतकऱ्यांनी बाजारात आक्रमक पवित्रा घेऊन लिलाव बंद पाडून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शासनाच्या अनुदानावर डोळा ठेऊन व्यापाऱ्यांनी ‘चोरावर मोर’ होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

  शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्याबाबत ‘शिकार की भिकार’ असा एक जुना वाक्प्रचार प्रचलित आहेत. त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आज आला. शासनाने दोन – तीन दिवसांपूर्वीच कांदा खरेदीबाबत नवीन निर्णय जाहीर केला. 1 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत जे शेतकरी कांदा विक्री करतील. त्यांच्यासाठी प्रति क्विंटल 350 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्याने विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या बाजारात अक्षरशः रांगा लागल्या. 30 मार्च रोजी कांदा बाजाराला सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारात  आणला होता. व्यापाऱ्यांनी दुपारच्या लिलावात अडिचशे रुपयांपासून ते साडेचारशे रुपयांपर्यंत बोली लावायला सुरवात केली. काल – परवापर्यंत 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल जाणाऱ्या कांद्याची अचानक घसरण झाल्याने शेतकरी संतापले अन् त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनासह अडत व्यापाऱ्यांना फैलावर घेऊन जाब विचारायला सुरवात केली. परंतु व्यापारी शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न लागले. परंतु शेतकऱ्यांनी त्यांचा डाव हाणून पाडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करून लिलावच बंद पाडला. शेवटी समितीच्या कर्मचाऱ्यांनी तोडगा काढून पुन्हा लिलाव करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर पुन्हा लिलाव सुरू होऊन अगोदर कवडीमोल भावाने खरेदी केलेला तोच कांदा 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांनी समितीच्या कर्मचाऱ्यांसह व्यापाऱ्यांना घेराव घातल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. 31 मार्चपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे या दिवशीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे. परंतु या अनुदानाच्या रकमेवर डोळा ठेऊन व्यापारी आपल्या पदरातून नाममात्र रक्कम देऊन ‘हमारे खत में तुम्हारा सलाम’ करण्याचा कुटिल डाव खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केला म्हणून त्यांचा कांदा आजघडीला कवडीमोल भावात खरेदी केला तरी चालेल. असा ‘गोड’ गैरसमज व्यापाऱ्यांनी करून घेतला आहे. सध्या बाजार समितीवर प्रशासकराज असल्यामुळे व्यापाऱ्यांवर कुणाचा पायपोस नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ सुरू असून शासनाचे अनुदान शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या जास्त पथ्यावर पडले असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  त्यामुळे अनुदान शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी ? असा प्रश्नही शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.