डोणगाव अतिवृष्टी मदत निधी वाटप घोटाळा प्रकरण ; दोषी तलाठ्यास निर्दोष ठरवले ! चौकशीवर प्रश्नचिन्ह

अधिकाऱ्यांनी दोषी ठरवलेल्या तलाठ्यास निर्दोष कसे ठरवले ? चौकशी अधिकाऱ्यांना तक्रारकर्त्याचा सवाल

वैजापूर ,​३०​ मार्च / प्रतिनिधी :-अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीने २०१९ मधील अतिवृष्टी मदत निधी वाटपात घोटाळा केल्याप्रकरणात तलाठ्यासह तिघांना दोषी ठरविल्यानंतर जास्तीचे वाटप केलेले १० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले असताना एका अधिकाऱ्याच्या समितीने खातेनिहाय केलेल्या चौकशीत संबंधित तलाठ्यास निर्दोष कसे काय ठरवले ? असा प्रश्न तक्रारदार व्यक्तीने केला आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यात डोणगाव येथील या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी आदिनाथ सपाटे, तलाठी राकेश बच्छाव व ग्रामसेवक संजय राठोड यांच्या त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. परंतु या समितीने चुकीचे पंचनामे करून जास्तीचे पैसे वाटप केले होते. त्यामुळे वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश डोखे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूर तहसीलदार व लोकयुक्त यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीत ८३ शेतकऱ्यांना १० लाख २१२ रुपये जास्तीचे वाटप झाल्याचे आढळून आले होते. या समितीने ही रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, अशी शिफारसही केली होती. यातील एक छदामही अद्याप वसूल झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कृषी विभागाच्या चौकशीत कृषी अधिकारी आदिनाथ सपाटे दोषी ठरले. जिल्हा परिषदेच्या चौकशीत ग्रामसेवक संजय राठोड हेही दोषी ठरले. मात्र महसूल विभागामार्फत विभागीय चौकशी अधिकारी आर.एस.भालेराव यांनी तलाठी राकेश बच्छाव यांची स्वतंत्र चौकशी केली. त्यात भालेराव यांना तलाठी बच्छाव निर्दोष आढळले. तसा अहवाल त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.

भालेराव यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह

भालेराव यांच्या या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत तक्रारदार प्रकाश डोखे यांनी आक्षेप नोंदविला असून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरवले असताना एक सदस्यीय समितीचे भालेराव तलाठी बच्छाव यांना कसे काय निर्दोष ठरवू शकतात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भालेराव यांचा अहवाल योग्य असेल तर मग अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल चुकीचा होता का ? असाही प्रश्न डोखे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डोखे यांनी सांगितले.

——————

डोणगाव अनुदान घोटाळा प्रकरणात दोषींकडून १० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु अद्याप वसुली झालेली नाही. महसूल विभागामार्फत केलेल्या चौकशीत तलाठ्याला निर्दोष म्हटले आहे.

माणिक आहेर, उपविभागीय अधिकारी, वैजापूर