वैजापूर शहर व तालुक्यात जोरदार पाऊस ; खरिप पिकांना जीवदान

वैजापूर,​१ सप्टेंबर​  /प्रतिनिधी :- यावर्षीच्या खरिप हंगामात सुरुवातीला मृगनक्षत्राचा दमदार पाऊस होऊन पेरण्या झाल्यानंतर पावसाने मागील एक ते दीड महिन्यापासून दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली असतांना काल रात्री व आज सायंकाळी पावसाने वैजापूर शहर व तालुक्यात हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.
पाऊस नसल्याने पिके सुकू लागली होती. पावसाची  अत्यंत गरज होती.शेतकरी पावसाची वाट पाहत असतांना गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात दमट वातावरण निर्माण होऊन बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारनंतर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दुपारनंतर सुमारे एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. आज झालेल्या पाऊस व जोराच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील अगरसायगांव, कनकसागज, जांबरगाव या भागात मका – बाजरी आडवी पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी अगरसायगावचे सरपंच भगतसिंग राजपूत यांनी केली आहे.