वीरगाव हद्दीतील दरोडाप्रकरणी दोन दरोडेखोर अटकेत ; गुन्हे शाखेची कारवाई

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलिस ठाण्यच्या हद्दीत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हमरापूर शिवारातील शेतवस्तीवर चाकुचा धाक दाखवुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ४४ हजार रुपये व अन्य दोन घरात दरोडा टाकुन एक लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीतील दोन पसार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली. यापुर्वी गुन्ह्यातील तिघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बॉबी हरी उर्फ सुरेश काळे (वय २२) रा. अंतपूर(ता.‌गंगापूर) असे एकाचे नाव असुन त्यास ३० एप्रिल रोजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यास तीन में पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आकाश छगन काळे (वय २२) रा. अंतपूर आहे दुसऱ्या आरोपीचे नाव असुन त्यास पोलिसांनी एक मे रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला चार में पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हमरापूर शिवारात गट क्रमांक ६६/१ मधील शेतवस्तीवर राहणारे शेषराव माधव चौधरी यांच्या घरात हा दरोडा पडला होता. एक नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबिय झोपलेले असतांना काळा टी शर्ट, पॅट, जरकिन घातलेल्या २५ ते ३५ वयोगटातील दरोडेखोरांच्या टोळीने हातात चाकु, कोयता, काठ्या, कुऱ्हाडीचा दांडा व गज घेऊन घरात प्रवेश केला. 

चौधरी यांच्या कुटुंबियांना शस्त्रांचा धाक दाखवुन रोख दोन हजार रुपये, दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, चार ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विरगाव पोलिसांच्या सहकार्याने तपास सुरु केला. या घटनेतील तीन आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली असुन दोन पसार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव, संजय घुगे, नदीम शेख, राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.